पापडखिंड धरण परिसरात बेकायदा बांधकामे तेजीत

. अनधिकृत बांधकामे आणि जमिनीच्या व्यवहारातून या परिसरातील दोन बड्या बिल्डरांच्या काही महिन्यांपूर्वीच हत्याही झाल्या आहेत.

वसई : विरार पूर्वेकडील पापडखिंड धरण परिसरात बेकायदा बांधकामे तेजीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून वॉचिंगसाठी असलेल्या बिटचौकीच्या साक्षीनेच बेकायदा बांधकामे सुरु असताना त्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरार पूर्वेकडील फुलपाडा, सहकारनगर आणि पापडखिंड धरण परिसर आता अनधिकृत चाळींचे माहेरघर बनले आहे. यात बड्या राजकीय नेत्यांची भागिदारी असल्याने त्यावर कारवाई करण्याची हिंमत महापालिका प्रशासन दाखवत नाही. अनधिकृत बांधकामे आणि जमिनीच्या व्यवहारातून या परिसरातील दोन बड्या बिल्डरांच्या काही महिन्यांपूर्वीच हत्याही झाल्या आहेत. समय चौहान या बिल्डरच्या हत्येप्रकरणी कुख्यात सुभाषसिंग ठाकूर टोळीचा सहभाग उजेडात आल्यानंतर सुभाषसिंग ठाकूरसह त्याच्या गँगस्टरांविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण सुभाषसिंग ठाकूरचा सहभाग असतानाही मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस त्याला ताब्यात घेण्यात अपयशी ठरले आहेत.

या परिसरात अनधिकृत बांधकामांना पुन्हा एकदा तेजी आली आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ज्या भागात अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत, त्याठिकाणी बिट चौक्या बसवल्या आहेत. त्या चौकीत अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अशीच एक बिट चौकी पापडखिंड धरणाला लागूनच बसवण्यात आली आहे. पण, बिट चौकीला कायमच टाळे असते. बिट चौकीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याच्या साक्षीने बिट चौकीसमोरच अनधिकृत बांधकामे खुलीआम उभी रहात आहेत. यावर आवर घातला नाही तर येत्या काही महिन्यातच धरणाच्या भिंतीपर्यंत अनधिकृत बांधकामे होतील, अशीच सध्याची स्थिती आहे.

विरार पूर्वेला पापडखिंड धरण आहे. त्या धरणातील पाणी फुलपाडा परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी दिले जाते. आता याच धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे धरणाच्या भिंतीपासून अगदी काही अंतरापर्यंत झाली आहेत. धरणातील पाणी पिण्यासाठी वापरले जात असतानाही यंदाची छठपूजा थेट धरणाच्या पाण्यात उतरून केली गेली. धरणापलिकडे टँकर माफियांनी पन्नासहून अधिक बोअरिंग मारल्या आहेत. त्या बोअरिंगमधील पाणी या परिसरात टँकरने विकले जाते. धक्कादायक बाब म्हणजे धरणाच्या जागेतूनच दररोज असंख्य टँकर पाणी विकत असताना त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे धरणाची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.
पाणी हे लोकांचे जीवन आहे आणि हेच जीवन सुरक्षित करण्यासाठी धरणक्षेत्र हे महापालिकेकडून आरक्षित केले जाते. येथे तर सुरक्षा रक्षकही नाही. जर हे क्षेत्रच सुरक्षित नसेल तर लोकांचे मरण हे स्वस्त होईल म्हणून आताच या परिसराकडे सजग तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलावीत अन्यथा पुढील काळातील जीवितहानीस किंवा गंभीर घटना घडल्यास तेव्हा मात्र वेळ गेलेली असेल.