डहाणू तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष

ग्रामीण आदिवासी भागातील छोट्या-मोठ्या किराणा दुकानांसोबत घरात देखील अवैधरित्या परराज्यातील बनावट दारू साठवून त्याची विक्री केली जात आहे.

डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध्य दारू विक्री तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण आदिवासी भागातील छोट्या-मोठ्या किराणा दुकानांसोबत घरात देखील अवैधरित्या परराज्यातील बनावट दारू साठवून त्याची विक्री केली जात आहे. असे अवैध धंदे करणाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक व्यसनाधीन होत चालले आहेत. सहज व स्वस्त दारू उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक कामधंदे सोडून व्यसनाधीन होत आहेत. अशा अवैध धंदे वाईकांवर कठोर कारवाईची गरज भासत आहे. मात्र संबंधित प्रशासन येथे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

 

डहाणू तालुक्याला लागूनच असलेल्या दादरा नगर हवेली व दमण येथून महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद असलेली व बनवट दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून संबंधित प्रशासनाच्या आशिर्वादानेच अवैध दारूची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दिवसाढवळ्या भर चौकातून दारूची तस्करी सुरू असून देखील संबंधित प्रशासन डोळेझाक करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तर काही ठिकाणी चक्क संबंधित प्रशासनाचे कर्मचारीच दारू विक्रेत्यांना अवैध व्यवसाय करण्यात भाग पाडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा व्यावसायिकांकडून दर महिन्याला हफ्ता म्हणून रक्कम वसूल करून त्यांना दारू विक्रीची परवानगी देण्यात येत आहे.

 

राष्ट्रीय महामार्गावर अच्छाड ते चीचपाडा दरम्यान अनेक हॉटेल, धाब्यांवर अवैधरित्या दारू विक्री व हॉटेलमध्ये बसून दारू पिण्याचे सत्र सुरू आहे. मात्र अशा ढाबे मालकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. संबंधित विभागाकडून अनेक वेळा अवैध दारू विक्रीवर छापा टाकण्यात येऊन दारू जप्त केली जाते. परंतु बहुतेक वेळा यात आरोपी हाताला लागत नाही. जर लागलेच तर ते काही दिवसांनी पुन्हा सुटून येऊन आपल्या व्यवसायाला पुन्हा सुरुवात करतात. छापा टाकून जप्त केलेल्या दारूवरील विशिष्ठ बॅच नंबरवरून हा माल नेमका कोणत्या दुकानातून आणला जातो, याची साधी चौकशीही केली जात नाही. एकूणच या सर्व प्रकाराकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष केल्यामुळे अशा अवैध व्यवसायांना नेमका वरदहस्त कोणाचा, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

हेही वाचा –

राजद्रोहाच्या कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती