डहाणू : सध्याच्या यंत्रसामुग्रीच्या युगात बैलगाडीचे चाक मंदावत चालले आहे. पूर्वी ग्रामीण भागात बैलगाडी दळणवळणाचे प्रमुख साधन मानले जात असे. लग्नाच्या सराईत वराड नेण्यासाठी, घर बांधण्यासाठी जंगलातून लाकूड आणण्यासाठी, तसेच शेतीतील इतर कामांसाठी बैलगाडीचा वापर होई. मात्र, नवनवीन तंत्रज्ञानामुळे मोटार वाहनांचा वापर वाढला आहे, त्यामुळे बैलगाडीची मागणी कमी होत आहे.
आदिवासी ग्रामीण भागातील शेतकरी दिवाळी सणानंतर भाताची कापणी करून भाताच्या जोडणीला सुरुवात करतात. त्यावेळी भात, गवत किंवा इतर शेतीमाल वाहून नेण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. एका फेरीत बैलगाडी चालकाला २०० ते ३०० रुपये मिळायचे, ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह साधला जाई. मात्र आता बैलगाडीच्या जागी आधुनिक मोटार वाहने वापरली जात असल्याने गवत, पावरी आणि इतर मालाची वाहतूक सोपी झाली आहे. यामुळे बैलगाडी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यंत्रसामुग्रीच्या प्रगतीमुळे बैलगाडी व्यवसाय मागे पडत असून, त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. बैलगाडी चालकांच्या उदरनिर्वाहावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पूर्वी आम्ही दिवसातून चार ते पाच फेर्या मारायचो, त्यातून एका फेरी मागे २०० ते ३०० रुपये मिळायचे. हंगामाच्या काळात २० ते ३० हजार रुपये कमावता येत होते. मात्र आता टेम्पो आणि पिकअप सारख्या आधुनिक वाहनांमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.”
– धाकल मुकणे, बैलगाडी चालक