पालघरः महासंस्कृती महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या समृद्ध इतिहासाला उजाळा देण्यासाठी ऐतिहासिक वस्तूच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत सिडको मैदान,कोळगाव येथे चालणार्या महानाट्य आणि महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी निकम बोलत होते
यावेळी आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर,तहसीलदार भालेराव उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त तसेच त्यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे अदानप्रदान, स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कला व संस्कृतीचे जतन संवर्धन आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात , अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा जिल्ह्यातील नागरीकापर्यंत पोहचवणे हा महासंस्कृती महोत्सव व महानाट्यामागील हेतू असल्याचे निकम यांनी पुढे बोलताना सांगितले.