महापालिकेच्या तीन आरोग्य केंद्रांचे उद्घाटन

कोपरी आणि डोंगरपाडा येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त अनिलकुमार पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील , मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी उपस्थित होते.

वसईः वसई-विरार महापालिकेमार्फत आरोग्य वर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार असून त्यापैकी ३ आरोग्य वर्धिनी केंद्राचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. चंदनसारजवळील कोपरी, डोंगरपाडा आणि नायगाव पूर्वेकडील प्रेरणा नगर येथील केंद्राचा त्यात समावेश आहे. वसई- विरार महापालिकेला १५ व्या वित्त आयोगानुसार महापालिका हद्दीत १२ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत गरजेच्या विविध ठिकाणी ही केंद्रे उभारण्याचे महापालिकेने ठरवले आहे. यातील चार आरोग्यवर्धिनी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही चार केंद्रे वैतरणा येथील फणसपाडा , विरार येथील फुलपाडा , नालासोपारा येथील उमरोळी आणि वसई पश्चिमेच्या माणिकपूर येथे सुरु करण्यात आली आहेत. यातील तीन केंद्रे तयार झाली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले. कोपरी आणि डोंगरपाडा येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त अनिलकुमार पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील , मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी उपस्थित होते.

नायगाव प्रेरणा नगर येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामध्ये एक आरोग्य अधिकारी, परिचारिका, एएनएम, सफाई कर्मचारी आणि बहुउद्देशीय कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या सर्वांचे वेतन शासनातर्फे देण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्राची इमारत ही महापालिकेची असणार आहे. महापालिकेची आरोग्य सेवा ही मोफत असल्याने या केंद्रामार्फत रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे. या केंद्रात गरोदर माता आरोग्य तपासणी, टेली कन्सल्टेशन, लसीकरण, आरोग्य बाबत जनजागृती, रुग्णांची प्राथमिक तपासणी ( ओपीडी ) , मोफत औषधे, तपासणी आणि रक्त चाचणी आदी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.