जव्हार :निसर्गाने भरभरून दिलेले उत्कृष्ट पर्यावरण आणि विविध नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे अशी ओळख असणार्या जव्हार तालुक्यातील नागरिकांना रक्तदाबाची समस्या सध्या गेल्या १० वर्षांच्या तुलनेत अधिक वाढली असून दैनंदिन २५ रुग्ण उच्च रक्तदाबाची तक्रार घेवून येत असल्याची माहिती जव्हार येथील पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे. यावर उपचार करताना रक्तदाब रुग्णांनी उपचाराकडे दुर्लक्ष न करता नियमितपणे गोळी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
एखाद्या व्यक्तीचा तात्पुरता रक्तदाब वाढल्यास त्याचा शरीरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. परंतु सततच्या वाढणार्या उच्च रक्तदाबामुळे महत्त्वाच्या अवयवांना इजा देखील होऊ शकते. शिवाय, काही वेळा अचानक बसलेला मानसिक धक्का, भीती, गर्भारपण हे रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतात. कित्येक वेळा आपला रक्तदाब मोजला जाणार या भीतीनेदेखील रुग्ण भय भित होऊन रक्तदाब वाढतो. रुग्ण रक्तदाब तक्रार घेवून डॉक्टरांच्या केबिनमध्ये पाऊल ठेवताच तात्पुरता रक्तदाब वाढतो. मोजण्याच्या नुसत्या कल्पनेने वाढलेला रक्तदाब फसवा असू शकतो. या फसव्या उच्च रक्तदाबाला “व्हाईटकोट हायपरटेन्शन” म्हणतात. मात्र उच्च रक्तदाबाचा नियमित त्रास असलेल्यांना कायम गोळी घ्यावी लागते. अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेताच गोळ्या बंद करतात. अशावेळी रक्तदाबाचा त्रास पुन्हा वाढू शकतो, नव्हेतर पक्षाघातासह हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गोळी बंद करू नका असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ यांनी दिला आहे.
उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे शक्य आहे. औषधाचा रक्तदाबावरील वाढलेला डोस कमी करता येईल, तोही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मात्र स्वतःच रक्तदाबावरील गोळी बंद केल्यास तब्येतीवर दुष्परिणाम होतात.
डॉ.रामदास मराड , वैद्यकीय अधीक्षक,पतंग शहा, उपजिल्हा रुग्णालय, जव्हार