शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ

आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

वसई : अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ वसई कोर्टाने केली आहे. शनिवारी वसईतील एका स्टुडिओत टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आत्महत्येला शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिची आई वनिता शर्मा हिने दिल्यानंतर वालीव पोलिसांनी शिझान खानविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. वसई कोर्टाने शिझानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने वालीव पोलिसांनी बुधवारी दुपारी त्याला वसई कोर्टात दुपारी तीनच्या सुमारास हजर केले होते. वसई कोर्टाने पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केल्याने शिझानचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.दरम्यान, शिझानशी प्रेमसंबंध सुरु झाल्यानंतर तुनिषाच्या वागण्यात बदल झाले होते. तुनिष्का हिजाब घालू लागली होती. त्यामुळे पोलिसांनी सर्वच दृष्टीकोनातून तपास करण्याची गरज आहे, अशी मागणी तुनिषा शर्माचा मामा पवन शर्मा यांनी केली आहे.