वसईकरांची आरोग्यव्यवस्था खासगी रुग्णालयाच्या दावणीला?; सहा महिन्यात १२ खासगी रुग्णालये

दहा वर्षाच्या कालावधीत शहरातील लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहोचली असून वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव यासोबतच वसई तालुक्याच्या ग्रामीण भागांचा देखील यामध्ये समावेश आहे.

वसई विरार शहर देशातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. मागील दहा वर्षाच्या कालावधीत शहरातील लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहोचली असून वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव यासोबतच वसई तालुक्याच्या ग्रामीण भागांचा देखील यामध्ये समावेश आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत वसई विरार शहर महापालिकेकडे केवळ दोन सरकारी रुग्णालय आहेत. याउलट शहरांमध्ये खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असून मागील सहा महिन्यांमध्ये बारा खासगी रुग्णालये सुरु झाली आहेत. त्यामुळे वसईकरांची आरोग्य व्यवस्था खासगी रुग्णालयात दावणीला बांधली जात असल्याचे चित्र दिसते आहे.

वसई विरार महापालिकेच्या एव्हरशाईन सिटी येथील प्रस्तावित रुग्णालयांचे काम देखील स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रलंबित आहे. तर डीएम पेटीट येथील रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे अद्याप सुरू झालेले नाही. वसई-विरार शहरात कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या मनमानी पद्धतीने बिले आकारून सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लूट केली. शहरात सरकारी रुग्णालयांची संख्या कमी असल्याने नागरिकांना खासगी रुग्णालय गाठावे लागत आहे. वसई विरार शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. वाढत्या संसर्गाने अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले. मात्र वसईतील ४५ खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी  लाखो रुपयांची बिले आकारून रुग्णांच्या कुटुंबाची मोठी पिळवणूक खासगी रुग्णालयांनी केली होती. अनेक गोरगरीब रुग्णांना ही बिले भरण्यासाठी आपले दागिने, घरे, शेतीदेखील गहाण ठेवत किंवा विकावी लागली होती.

लोकप्रतिनिधींच्या एका पाठोपाठ एक खासगी रुग्णालयांच्या उद्घाटनाचे सत्र पाहता वसई विरारमधील नागरिकांची आरोग्य व्यवस्था खासगी रुग्णालयांच्या दावणीला बांधली आहे, असे वाटते.

– राजेंद्र ढगे, रुग्णमित्र

वसई विरार शहरात २९९ रुग्णालये, १ हजार ९९० क्लिनिक तर १६९ पॅथॉलॉजी लॅब आहेत. वसई-विरार महापालिकेची दोन रुग्णालये असून २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. वसई विरार शहरात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास १२ नव्या खासगी रुग्णालयांचे उद्घाटन झाले आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या बारा खासगी रुग्णालयाचे उद्घाटने देखील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते झाले आहेत. त्यामुळे आता वसई-विरारकरांची आरोग्य व्यवस्था खासगी रुग्णालयांच्या दावणीला बांधण्यात लोकप्रतिनिधींचा देखील सहभाग आहे का?, असा प्रश्न शहरातील सुज्ञ नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

वसई विरार शहर महापालिका हद्दीत अंदाजे २५ लाख लोकसंख्या असल्याचा दावा महापालिका करते. २५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी फक्त दोन सरकारी रुग्णालय असून अद्याप आधुनिक सुसज्ज रुग्णालय वसई विरार महापालिकेला का उभारता आले नाही?, वसई विरार शहरात सरकारी रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून वसईकर करत आहेत. मात्र स्थानिक आमदार तसेच खासदार आणि  लोकप्रतिनिधी यांच्याकडून या गोष्टीची कुठलीही दखल घेतली जात नसून याउलट काही लोकप्रतिनिधींकडून शहरातील सरकारी रुग्णालयांना विरोध होताना दिसत आहे.

हेही वाचा –

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होणार, SCचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात काय होणार?