पेलटेक कंपनीविरोधात कामगारांचे बेमुदत उपोषण

मात्र यावर योग्य तो निर्णय होत नाही.त्यामुळे कामगारही वैतागले आहेत.चार महिने काम नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वाडा:  तालुक्यातील मेट गावाच्या हद्दीत असलेल्या ’ पेलटेक हेल्थकेअर’ या कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्विकारल्याच्या रागातून येथील 15 कामगारांना कंपनीने गेल्या चार महिन्यांपूर्वी कामावरून कमी केले आहे.वारंवार विनंती करूनही कंपनी प्रशासन कामगारांना कामावर घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने संतापलेल्या कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या झेंड्याखाली आज पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ’पेलटेक हेल्थकेअर’ या कंपनीत औषधांचे उत्पादन घेतले जाते.300 ते 350 स्थानिक मराठी कामगार या कंपनीत काम करीत आहेत.गेल्या चार महिन्यांपूर्वी येथील काही कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्विकारले आहे.त्यामुळे कंपनी प्रशासनाने याचा राग मनात धरून काही कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले. गेले चार महिने भारतीय कामगार सेना,कामगार व कंपनी प्रशासनात चर्चा सुरू आहे. मात्र यावर योग्य तो निर्णय होत नाही.त्यामुळे कामगारही वैतागले आहेत.चार महिने काम नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी आजपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनात संदीप सोगळे,तेजबहादुर यादव,अनिल भोईर, जयेंद्र पाटील, महेश घरत,विकास पाटील, ॠषीकेश पाटील, ललन यादव,रामनंदन गौतम,निलेश पाटील, अशिष दुबे,विजय जयस्वाल, जयनाथ जयस्वाल, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रप्रकाश यादव असे 15 कामगार उपोषणाला बसले आहेत.

यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला असता कंपनीचे मालक हे जर्मनी येथे तर मुख्य व्यवस्थापक हे परगावी गेले असल्याने याबाबत मला काही निर्णय किंवा सांगता येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कामगारांना न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मिलींद चौधरी व कामगार प्रतिनिधी संदीप सोगळे यांनी केला आहे.