वसई: अपंग कल्याणकारी संस्था आणि इतर सहकारी संस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने वसई-विरार दिव्यांग फेडरेशनच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अपंग व दिव्यांगाच्या प्रश्न व समस्यांबाबत वसई-विरार दिव्यांग फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या संस्थांच्या प्रतिनिधींनी 18 मे 2023 रोजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी आजतागत याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या संस्थांच्या प्रतिनिधींनी 18 जुलै रोजी पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेऊन; अपंगांच्या प्रश्न सोडवण्याबाबत अंमलबजावणी का होत नाही? अशी विचारणा केली होती. अपंग व दिव्यांगांच्या या प्रश्नाने आयुक्त संतापले होते. अपंग व दिव्यांगांच्या अंगावर धाऊन जात त्यांचा अपमान केला होता, असे आंदोलनकर्त्या अपंग व दिव्यांगांचे म्हणणे आहे. आयुक्तांचा असंवेदनशील आणि त्यांनी केलेल्या दमदाटीचा निषेध म्हणून वसई-विरार दिव्यांग फेडरेशनच्या वतीने या ‘निषेध धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या धरणे आंदोलनाची सुरुवात विरार पूर्व साने गुरुजी बालउद्यानापासून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढून करण्यात आली होती. आंदोलनकर्त्यांनी ‘दिव्यांगांचा अपमान, आयुक्तांचा निषेध , ‘सहानुभूती नको, सन्मान हवा अशा घोषणा देत महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला. दरम्यान; मुख्यालयाच्या दरवाजावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबवले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चर्चेअंती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अपंग-दिव्यांगांना सुसंवादाकरता समिती सभागृहात पाचारण केले. या वेळी अपंग-दिव्यांगांच्या प्रश्न आणि समस्यांवर पुन्हा एकदा चर्चा केली केली. अपंग-दिव्यांगांच्या झालेल्या अपमानाबद्दल अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी दिलगिरी व्यक्त केली. प्रशासनाच्या वतीने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, अशी हमी आंदोलनकर्त्यांना सरतेशेवटी दिली गेली. परंतु; 18 जुलैला आयुक्तांनी दिव्यांगांचा जाहिरपणे जो अपमान केला
त्याचा निषेध म्हणून यापुढे प्रत्येक महिन्याच्या 18 तारखेला महापालिका मुख्यालयाजवळ ‘आयुक्त निषेध दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे संयोजक बाबू वाल्मिकी यांनी दिली आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व बाबू वाल्मिकी आणि शमीम खान यांनी केले.