घरपालघरहा लंपी तर नाही ना ? चिंचणीत लंपीसदृश्य रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त

हा लंपी तर नाही ना ? चिंचणीत लंपीसदृश्य रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त

Subscribe

डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि वाणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती असून अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील करीत आहेत.

वाणगाव :  पालघर जिल्ह्यातील जनावरांमध्ये अनेक ठिकाणी लंपीसदृश्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि परिसरातील शेतकर्‍यांची गुरे तसेच रस्त्यांवर मोकाट फिरत असलेली अनेक जनावरे देखील लंपीसदृश्य रोगाने बाधित झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असली तरी पुरेशा जनजागृतीअभावी अनेक जनावरे लसीकरणापासून वंचित राहिल्याने लंपीचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि वाणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती असून अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील करीत आहेत. गेल्या महिन्यापासून राजस्थान आणि गुजरात राज्यात लंपी या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन हजारो जनावरे या रोगामुळे बळी पडली होती. या रोगाचा होणारा जलद प्रादुर्भाव बघून महाराष्ट्र सरकारने लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि इतर उपाय योजना मोहीम सुरू केली आहे. डहाणू तालुक्यात जवळपास ७१ हजार गोवंशीय जनावरे असून त्यांचे लसीकरण प्रगतीपथावर आहे. मात्र याबाबतीत जिल्हा परिषद पशू संवर्धन विभागाकडून सुरू असलेल्या जनजागृतीबाबत ग्रामीण आदीवासी भागातील अनेक शेतकरी अनभिज्ञ असून त्यांच्या जनावरांचे लसीकरण अजूनही झाले नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या जनावरांमुळे देखील लंपी रोगाची साथ पसरण्याची शक्यता असून या जनावरांचे मालक कोण आहेत, हे नक्की माहीत नसल्याने त्यांचे लसीकरण करण्यात देखील अडचणी येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -