बनावट दारूसह मुद्देमाल जप्त

यावेळी दमण बनावटीच्या दारूच्या तीस बॉक्समधून 326 लिटर दारू आणि कारसह एकूण 7 लाख 40 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मनोर: तलासरी तालुक्यातील कोचाई भागात दमण बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक केली जाणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती.बुधवारी रात्री भरारी पथकाच्या कर्मचार्‍यांनी कोचाई-लुहारी रस्त्यावर नाकाबंदी लावली होती.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका संशयित कारला थांबवून तपासणी केली असता कारमध्ये दमण बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला.कार चालक उमेशभाई चंपकभाई वारली (वय.30) हा दमण बनावटीच्या विदेशी दारूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने कार मधून वाहतूक करीत असताना आढळून आला.यावेळी दमण बनावटीच्या दारूच्या तीस बॉक्समधून 326 लिटर दारू आणि कारसह एकूण 7 लाख 40 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या दारूच्या साठ्याबाबत विचारणा केली असता आरोपीने उमेशभाई चंपकभाई वारली याने जप्त केलेला दारूचा साठा दादरा नगर हवेली येथील एका अनोळखी इसमाकडून खरेदी करून संतोषभाई (रा . आच्छाड) याला लग्न कार्यासाठी पुरवठा करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली.संतोषभाई यास फरार घोषित करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65( A ) ( E ) 81 , 83,98 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकातील अधिकारी आणि जवानांकडून करण्यात आली आहे.कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क निरीक्षक सीमा आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी मदत केली.