जव्हार: तालुक्यात खरीप पीक घेतल्यानंतर रब्बी हंगामात देखील पीके घेण्यात येतात. यात भाजीपाला, फळबाग लागवड देखील अंतर्भूत आहेत. अश्या बदलत्या शेतीविषयक धोरणांच्या माध्यमातून या भागातील शेतकर्यांना दिलासा मिळत आहे. मात्र चांगली पिके येण्यासाठी लागणारी खते, बी – बियाणे भाव खात असल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नव वर्षात शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या आदिवासी तथा दुर्गम भागातील शेतकर्यांना आर्थिक फटका बसणार असून शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतकर्यांना सतावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकर्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत.
वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रति पिशवी १ हजार ३७० रुपयांवरून १ हजार ६१० रुपयांवर गेली आहे. टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत १३२० ऐवजी १३७०, तर १० : २६ : २६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४९० रुपयांवरून १७६० रुपये होणार आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या किंमतीतील वाढ शेतकर्यांसाठी चिंता वाढवणारी आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. यात रासायनिक खतांची भूमिका आणखी महत्त्वाची असते. दरम्यान, सततच्या दरवाढीला विरोध करत सरकारकडून या वाढीव दरांचे पुनरावलोकन करण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
**खतांच्या किमतीचा तपशील**
खताचे नाव सध्याचे दर. वाढीव दर
डीएपी. १३७०. १६१०
टीएसपी ४६ १३२०. १३७०
१०:२६:२६ १४९०. १७४०
१२:३२:१६. १४९०. १७४०
रासायनिक खत कंपन्याचे दर अगोदरच जास्त आहेत. दर वाढवल्यामुळे शेतकरी चारऐवजी दोनच बॅग घेईल. शेतमालाला भाव नसल्याने सध्या शेतकरी हैराण झाला असून बाजारात दुकानदारांनी रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा केला आहे.
- काशिनाथ चौधरी, शेतकरी