जव्हार: आरोग्यसेवा हा मुद्दा नेहेमीच जव्हार तालुक्यात ऐरणीवर असतो. शहरातील १०० खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड ,वाडा हे तालुके तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीक अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्य चिकित्सकपदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकांसह २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचार्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे.
तसेच या रुग्णालयात प्रसूति व स्रीरोग तज्ज्ञ, सर्जन,फिजीशियन, अस्थिरोग तज्ज्ञ,नेत्ररोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ तसेच भूलतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवा देताना मर्यादा येऊन रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक, सेलवास, ठाणे येथे पाठविले जात आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयाकडे १०७ मंजूर पदे आहेत. त्यातील २७ विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण येत असून, त्याचा रुणसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात आरोग्य विभागाचे येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका आरोग्य सेवेला बसत आहे. रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात शेकडोंत आणि सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी तोकडे अशी स्थिती सध्या आहे. शासनाकडून आरोग्य सेवेतील पदांची भरती केली जात नाही. मध्यंतरी भरती करण्यात आली. मात्र, त्यात पुरेशी पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे गेली अनेक वर्षे येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे.
रुग्णालयातील एकूण मंजूर पदे : १०७
भरलेली पदे : ८०
रिक्त पदे: वैद्यकीय अधीक्षकांसह २७
जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १०७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८० पदे भरलेली असून २७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा अहवाल दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जातो. मंजूर असलेली पूर्ण पदे भरलेली नाहीत. उपलब्ध कर्मचारी आणि काही कंत्राटी कर्मचारी यांच्यावर कामकाज सुरू आहे.
– डॉ. भरतकुमार महाले,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय जव्हार