घरपालघरकशिद-कोपर गावची तळीये-माळीणच्या दिशेने वाटचाल?

कशिद-कोपर गावची तळीये-माळीणच्या दिशेने वाटचाल?

Subscribe

जलकुंभाच्या कामाकरता कशिद-कोपर गावातील मोठमोठे डोंगर भुईसपाट करण्यात आले आहेत. शिवाय कित्येक वृक्षांचाही बळी देण्यात आला आहे.

वसई : वसई-विरार व मीरा-भाईंदर महापालिकेकरता एमएमआरडीएच्या माध्यमातून पाण्याची साठवण टाकी बनवण्यात येत असलेल्या विरारनजिकच्या कशिद-कोपर डोंगराचा भाग मंगळवारी सकाळी कोसळला. या घटनेमुळे कशिद-कोपर ग्रामस्थांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे, त्याठिकाणी अजूनही दगड लागलेला नाही. संपूर्ण मुरूम मातीचा डोंगर पोखरल्यामुळे डोंगर परिसरात भूस्खलन होत सुरु झाल्याचे आजच्या घटनेने उजेडात आले आहे. वसई-विरार महापालिका व मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सूर्या धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) विरार येथील कशिद-कोपर गावात जलकुंभ उभारण्यात येत आहे. या जलकुंभात ४०३ एमएलडी इतका पाणीसाठा करण्यात येणार आहे. यातील २१८ एमएलडी पाणी वसई-विरार महापालिका आणि १८५ एमएलडी इतके पाणी मिरा-भाईंदर महापालिकेला देण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मागील दोन वर्षे या जलकुंभाच्या कामाला गती आली आहे. जलकुंभाच्या कामाकरता कशिद-कोपर गावातील मोठमोठे डोंगर भुईसपाट करण्यात आले आहेत. शिवाय कित्येक वृक्षांचाही बळी देण्यात आला आहे.

या जलकुंभाच्या खालच्या बाजूला कशिद-कोपर हे गाव वसले आहे. पर्यावरणाची हानी करून वसई-विरार व मीरा-भाईंदर महापालिकेकरता बांधण्यात येणाऱ्या जलकुंभामुळे भविष्यात कशिद-कोपर या गावांची अवस्था पुण्यातील माळीण व महाडमधील तळीये गावांसारखी होईल, अशी भीती कशिद-कोपर ग्रामस्थांनी आधीच व्यक्त केलेली आहे. हा जलकुंभ अन्यत्र हलवून पर्यावरणाचे पर्यायाने गावाचे रक्षण करावे, अशी मागणी मागील दोन वर्षे ग्रामस्थ करत आहेत. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने कशिद-कोपर ग्रामस्थांनी ‘गाव बचाव संघर्ष समिती’च्या माध्यमातून मार्च महिन्यात या जलकुंभ कामाच्या ठिकाणी आमरण साखळी उपोषण सुरू केलेले होते. मात्र ग्रामस्थांचे हे आंदोलन एमएमआरडीएने पोलिसांच्या मदतीने मोडीत काढत या कामाला गती दिली होती. त्यावेळी अनेक महिलांसह अनेक ग्रामस्थांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतरही कशिद-कोपर ग्रामस्थांचा या विरोधातील लढा सुरूच आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या डोंगराचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळल्यानंतर कशिद-कोपरची अवस्थाही माळीण व तळीयेसारखी होईल, ही ग्रामस्थांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

- Advertisement -

०००

७ हजार ६०० चौरस मीटर म्हणजेच जवळपास ७ हजार एकर जागेत ही टाकी एमएमआरडीए बनवत आहे. या टाकीत तब्बल ३.८ कोटी लिटर पाणी साठवण होणार आहे. इतक्या मोठ्या क्षमतेच्या टाकीच्या पायाकरता आवश्यक दगड अजून लागलेला नाही. याठिकाणी केवळ मुरूम माती आहे. मंगळवारी सकाळी जाळीसहित मातीचा मोठा ढिगारा खाली आला आहे. याचाच अर्थ एमएमआरडीए जाणीवपूर्वक तळीये-माळीणनंतर कशिद-कोपरला जमिनीखाली गाडू इच्छित आहे.

- Advertisement -

— समीर वर्तक

०००

एमएमआरडीए आणि ठेकेदार यांनी पूर्ण अभ्यास न करताच डोंगर पोखरण्याचे काम सुरु केले आहे. संपूर्ण डोंगर मुरुम मातीचा आहे. खोदकाम डोंगराच्या मधल्या भागात सुरु केल्याने वरून माती कोसळणारच होती. आता डोंगर कोसळत राहिल. टाक्या दुसऱ्याठिकाणी करण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा संपूर्ण कोसळून गाव मातीखाली जाईल.

—चरण भट, पर्यावरण अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -