वसई : मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. ३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावर घडणारे अपघातग्रस्त नागरिक आणि गावपाड्यांतील नागरिकांची वैद्यकीय समस्या लक्षात घेऊन २०१४ मध्ये महामार्गावरील खानिवडे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यासाठी सर्व्हे क्रमांक १४८ व १६२ मधील ०.९९ हेक्टर इतकी जागा ही निश्चित करण्यात आली होती.मात्र या रुग्णालयाच्या कामात वनविभागाच्या जागेचा हस्तांतरण प्रश्न, आराखड्यातील बदल,प्रशासकीय मंजुरीसाठी झालेला विलंब अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जवळपास दहा वर्षे या रुग्णालयाचे काम रखडले होते.
या बांधकामाच्या आराखड्याच्या कामाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.उभारण्यात येणारे रुग्णालय हे दोन मजली असून त्याचे क्षेत्र ३ हजार ३९९ चौरस मीटर इतके आहे. या बांधकामासाठी १३ कोटी ३२ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.सद्यस्थितीत पायाचे खोदकाम, आरसीसी कॉलम उभे करणे, पीसीसी अशी कामे सुरू झाली आहेत. या रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यास दीड ते दोन वर्षे जरी लागणार असली तरी मार्च अखेरपर्यंत आम्ही या इमारतीचे पूर्ण स्ट्रक्चर उभे करणार आहोत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
अशी असेल इमारत
तळ मजला- मेडिकल स्टोअर, पोलीस चौकी, स्टोअर
पहिला मजला – पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी कक्ष, रक्तपेढी
एक्स-रे कक्ष, ओपीडी ४, ड्रेसिंग कक्ष, रीफ्रेंक्शन कक्ष, रीकव्हरी कक्ष.
दुसरा मजला-कॉन्फरन्स हॉल, आस्थपना विभाग, वैद्यकिय अधिक्षक कक्ष, मेलवॉर्ड, पेडियाट्रीक वॉर्ड, जनरल वार्ड, लेबर कक्ष, प्रसाधनगृह यांचा समावेश आहे.