वसई-विरार महापालिका कंत्राटदारावर मेहरबान

कंत्राटदारावरील महापालिकेच्या या मेहरबानीमुळे भाजपचे नालासोपारा शहर सचिव समीर निकम यांनी संताप व्यक्त केला आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पाचूबंदर गाव, नवघर, समेळपाडा व विराट नगर येथील स्मशानभूमींत बसवण्यात आलेल्या गॅस शवदाहिनी कामांत अनेक त्रुटी तसेच अक्षम्य चुका असतानाही महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला देयक अदा केल्याचे उघड झाले आहे. कंत्राटदारावरील महापालिकेच्या या मेहरबानीमुळे भाजपचे नालासोपारा शहर सचिव समीर निकम यांनी संताप व्यक्त केला आहे. ही कामे अपूर्ण असताना व त्यात अनेक तांत्रिक त्रुटी असताना कंत्राटदाराला देयक अदा करण्याचे कारण काय?, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे. कोविड संक्रमण काळात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आकडा लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने वसईतील पाचूबंदर गाव, नवघर, नालासोपारा येथील समेळपाडा व विरार येथील विराट नगर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला होता. या कामाकरता महापालिकेने ३० एप्रिल २०२१ रोजी प्रशासकीय ठरावही केला होता. या ठरावानुसार उपरोक्त चार स्मशानभूमींत गॅस शवदाहिनी बसवण्याचे काम मे. युव्हिरॅक्स इंजीनियरिंग या कंत्राटदाराला देण्यात आले.
या अनुषंगाने प्रति गॅस शवदाहिनी ३२ लाख ९७ हजार ५१० इतकी रक्कम निश्चित करण्यात आली. तर चार स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनीकरता महापालिकेने तब्बल १ कोटी ३१ लाख ९० हजार ०४० रुपये खर्च केले आहेत. या रकमेत संबंधित कंत्राटदाराला तीन वर्षे या गॅस शवदाहिनींची देखभाल-दुरुस्तीही करावी लागणार आहे. दरम्यान, या कामात अनेक तांत्रिक त्रुटी व अक्षम्य चुका आहेत. त्यानंतरही महापालिकेने मे. युव्हिरॅक्स इंजीनियरिंग या कंत्राटदाराला देयक अदा केले आहे. त्यामुळे भाजपचे नालासोपारा शहर सचिव समीर निकम यांनी महापालिकेच्या कारभारावर आक्षेप घेतला आहे.
विशेष म्हणजे पाचूबंदर येथील गॅस शवदाहिनीचे दोन ब्लोअरवर तर दोन ब्लोअर खाली लागल्याने मृतदेह दहन करण्यास दोन तासांहून अधिक वेळ लागतो. तसेच मृतदेह पूर्णपणे जळत नाही, याकडे निकम यांनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे. समेळपाडा, नवघर व विराट नगर येथील गॅस शवदाहिनी तीन महिन्यांपासून कार्यरत नाही. शिवाय या गॅस शवदाहिनी कशा चालवाव्यात, याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नसल्याचे निकम यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत महापालिकेने मे. युव्हिरॅक्स इंजीनियरिंगला देयक अदा करण्याची घाई का केली?, यात कुणाची टक्केवारी आहे?, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित करत महापालिकेला धारेवर धरले आहे.