वसईः वसई -विरार महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनात “शिस्तीचा” अभाव आढळतो. महापालिकेचे डॉक्टर वेळेचे बंधन पाळत नाहीत. स्वतःच्या खासगी ओपीडीकडेच त्यांचे अधिक लक्ष असल्याने रुग्णांकडे दुर्लक्ष होत असून अशा डॉक्टरांना त्वरीत सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली आहे. रुग्णमित्र ढगे यांच्या आई महापालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात ऑर्थोपेडीक डॉक्टरांना भेटण्यासाठी ओपीडीमध्ये पाच वाजता गेल्या होत्या. पण, डॉक्टर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान ओपीडीत आले. याची तक्रार ढगे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे यांनी केली. त्यानंतर ढगे यांना लगेचच संबंधित डॉक्टरचा फोन आला. माझ्या मागे का लागला आहे?. मी माझी स्वतःच्या खासगी ओपीडीमध्ये येणार्या रुग्णांना दोन-दोन तास प्रतिक्षेत बसवतो, अशी उत्तरे दिली. या घटनेवरून ढगे यांनी उपायुक्त द्वासे यांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. द्वासे यांनी तक्रारदाराचे नाव उघड करणे योग्य नाही, असेही ढगे यांचे म्हणणे आहे.
खासगी प्रॅक्टीसला विरोध नाही. पण, महापालिका रुग्णालयासाठी बांधिल असल्याने वेळेत येण्याची अपेक्षा करदाता नागरीक जरुर करू शकतो. ओपीडी आणि आपल्या नोकरीच्या वेळेचे बंधन न पाळणार्या अशा डॉक्टरांना त्वरीत सेवामुक्त करावे, जेणेकरून त्यांच्या खासगी ओपीडीमधील रुग्णांना दोन-दोन तास ताटकळत बसावे लागणार नाही, अशी मागणी ढगे यांनी केली आहे. महापालिकेने डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचार्यांची बायोमेट्रीक हजेरीकडे बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री क्रमांकाची सोय रुग्णांना करून द्यावी लागते. जेणेकरून रुग्णांना येणार्या समस्या,त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाऊ शकते. पण, उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे याबाबतीत गंभीर नसल्याचे आढळून येत असल्याची ढगे यांची तक्रार आहे.