वन जमीन हडपल्या प्रकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी

पालघर तालुक्यातील मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत कुडे गावातील राष्ट्रीय महामार्गा लगतची सुमारे 43 गुंठे वनजमीन खाजगी प्रकल्पासाठी बळकाण्यात आली आहे.

मनोर: मुंबई -अहमदाबाद महामार्गालगतच्या कुडे गावातील वन विभागाच्या मालकीची जमीन भूमिअभिलेख विभागाच्या मदतीने भूमाफियाने हडप केल्या प्रकरणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली आहे.भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. लक्षवेधी सुचनेच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या सचिवांनी कारवाईचा अहवाल मागितल्याने जिल्हा प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. वन जमीन हडपण्याच्या कामात सहभाग असलेलले अधिकारी आणि कर्मचार्‍यांना संभाव्य कारवाई पासून वाचवण्यासाठी तालुका स्तरावरून अनुकूल अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाकडे दिल्याची माहिती समोर येत आहे.पालघर तालुक्यातील मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत कुडे गावातील राष्ट्रीय महामार्गा लगतची सुमारे 43 गुंठे वनजमीन खाजगी प्रकल्पासाठी बळकाण्यात आली आहे.

वन जमीन असलेल्या जागेत 50 मोठ्या आकाराचे स्थानिक वृक्ष तसेच झाडे – झुडपे असताना जमिनीवर गवत आणि भातशेती केली असल्याचा दाखला महसूल विभागाने दिलेला आहे. गावातील परंतु महामार्गापासून दुरच्या अंतरावर असलेल्या शेतकर्‍याला हाताशी घेऊन भूखंड क्रमांक 122 अ/14 ची खरेदी करून भूमिअभिलेख विभागाच्या मोजणीत महामार्गालगतच्या वनविभागाच्या जमिनीच्या ठिकाणी भूखंड असल्याचे दाखविण्यात आले आहे. 43 गुंठे क्षेत्र असलेल्या जमिनीचा नकाशा काढताना वांद्री धरणाच्या उजव्या कालव्याची सलगता राखण्यात आलेली नाही.कालवा निर्मितीच्या काळात तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राबवलेल्या भूसंपादन प्रक्रीयेत नोंद नसल्याने ग्रामस्थ आणि वन व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे.सर्व्हे क्रमांक 122/अ/44 च्या खरेदी वेळी सातबारा उतार्‍यावर भात शेती व गवत असल्याचा उल्लेख आहे परंतु सद्यस्थितीत जमिनीवर 50 मोठी झाडे आहेत. झाडांना ड्रील मशीनचा वापर करून खोडांना भोकं पाडून त्यात रसायनाचा वापर करून झाडे मारून टाकणार्‍या टोळीला ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले होते.तसेच कोणतीही सभा आयोजित करण्यात आलेली नसल्याने दिलेला बिनशेती दाखला बनावट असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे.संवेदनशील वन क्षेत्रातील वन वनविभाग,महसूल तसेच ग्राम विकास विभागाच्या सहकार्याने वन विभागाच्या मालकीची जमीन शेतीची जमीन दाखवून बिनशेतीचा बेकायदेशीपणे दाखला देण्यात आला आहे.पालघर जिल्हा प्रशासनाने केलेले कृत्य बेकायदेशीर आणि गंभीर स्वरुपामूळे कुडे गावातील ग्रामस्थांच्या मनात प्रशासनाबाबत संतापाची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे ग्रामसेवक,सरपंच सध्याच्या जमीन मालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी लक्षवेधी सूचने द्वारे करण्यात आली आहे.