घरपालघरजिल्ह्यात लसीकरणाचा शुभारंभ; एक लाखांहून अधिक मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात लसीकरणाचा शुभारंभ; एक लाखांहून अधिक मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट

Subscribe

सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून चहाडे येथील स्व. तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पालघर पंचायत समिती सभापती रंजना म्हसकर, जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, जिल्हा पेईन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपुर या १५ वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीला लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयापासून लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील एकूण १ लाख ६८ हजार ९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा शुभारंभ होत असून ही आनंदाची गोष्ट आहे. आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल, असे मत यावेळी अध्यक्षा वाढाण यांनी व्यक्त केले. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे असून लसीकरणाबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाची तिसरी लाट आपण थोपवू शकतो. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळा आणि कुठल्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैदेही वाढाण यांनी यावेळी केले.

- Advertisement -

लहानपणी जे लसीकरण झाले आहे. त्याचाच हा भाग असून आता कोविडच्या पार्श्वभूमीवर ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी यावेळी केले. यानंतर मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे, अशा सूचना अध्यक्ष वाढाण यांनी केल्या. यावेळी चहाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

सफाळ्यात २३० मुलांचे लसीकरण

देशभरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवालय सफाळे येथे माजी सरपंच अमोद जाधव आणि प्रशांत किणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ग्रामसेवालय सफाळे येथे श्रेया अविनाश पिंपळे या विद्यार्थिनीस कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सफाळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या मुलांना घेऊन लसीकरण केंद्रात सकाळपासूनच रांगा लावण्यास सुरुवात केली होती. ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गर्दी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. लसीकरण करण्याआधी विद्यार्थ्यांना आणि पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पहिल्याच दिवशी परिसरातील २३० विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देऊन लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद रणदिवे, आरोग्य सहाय्यक मनोज पिंपळे, महिला कर्मचारी, आशासेविका आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

Mhada Exam 2021 : म्हाडा परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -