घर पालघर भाषेच्या समुद्रात पोहायला शिका

भाषेच्या समुद्रात पोहायला शिका

Subscribe

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी पाहुण्यांची ओळख व मनोगत व्यक्त करताना डॉ. गिरीश लटके यांच्या सामाजिक जाणिवेचा व त्यांच्या कार्याचा विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.

वसईः शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपले पाहिजे आणि भाषेच्या समुद्रात पोहायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश लटके यांनी केले. ते अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आयोजित मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन कार्यक्रमात उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाषेच्या माध्यमातून माणसांचे मानसिक भरणपोषण होते. भाषा हीच समाजाच्या दुःख वेदनांशी नाते जोडण्यासाठी मदत करते. म्हणूनच आपल्या मातृभाषेचे जतन करतानाच विद्यार्थ्यांनी त्या भाषेतील साहित्याच्या प्रांतात प्रवेश करून साहित्यातील सामाजिक, सांस्कृतिक जाणिवांशी जोडून घेतले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बबनशेठ नाईक यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या समृद्ध इतिहासाची ओळख करून घ्यावी असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी पाहुण्यांची ओळख व मनोगत व्यक्त करताना डॉ. गिरीश लटके यांच्या सामाजिक जाणिवेचा व त्यांच्या कार्याचा विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.

मराठी विभाग प्रमुख डॉ. शत्रुघ्न फड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी वाङ्मय मंडळातर्फे वर्षभरात राबवल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या बोलीभाषांचेही जतन करावे असा विचार मांडला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी भाषेतील साहित्य वाचतानाच व्यावहारिक मराठीतील अर्जलेखन, मराठी शुद्धलेखन व नियमांचेही गांभीर्यपूर्वक अध्ययन करण्याचा सल्ला दिला. प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी नेविका कुडू हिने ’बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ हे गीत गाऊन आपल्यातील गायन कलेला आविष्कृत केले. तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी गायत्री घडवले हिने अण्णाभाऊ साठे यांची ’स्मशानातील सोनं’ ही कथा सादर करून उपस्थितांना भूकेसारख्या सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. यावेळी मराठी वाङ्मय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून प्रिती पाटील आणि मंगेश घाडीगावकर या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ कवाळे, डॉ. हिरानंद खंबायत, डॉ. दीपा मुर्डेश्वर-कत्रे, डॉ. महादेव आंधळे, डॉ. नितीनकुमार बांगर, डॉ. विजयानंद बनसोडे, डॉ. श्रीराम डोंगरे, प्रा. पियुष राणा, प्रा. सुधीर सैंदाणे, प्रा. माधव पवार, प्रा. लतिका पाटील, प्रा. देविका गावंड, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. सुरेश सुर्वे अशा महाविद्यालयातील प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश औटी यांनी केले. डॉ. सखाराम डाखोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -