घरपालघरपर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार - आदित्य ठाकरे

पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार – आदित्य ठाकरे

Subscribe

कांदळवनाचा ऱ्हास झाला असून मीरा भाईंदर शहराच्या पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाच्या अशा मुद्यावर मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

मीरा भाईंदर शहरात गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. कांदळवनाचा ऱ्हास झाला असून मीरा भाईंदर शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा मुद्यावर मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली. शहरात जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला किंवा होत असेल, नियमांचे उल्लंघन होत असेल तर याप्रकरणी चौकशी करून संबंधितांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबई शहराच्या सिमेजवळ मिरा-भाईंदर शहर असून शहरात पर्यावरणाचा समतोल रहावा, यासाठी सर्व शासकीय संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिका स्तरावर अनेक विकास प्रकल्प राबवत असताना अनेक प्रकल्पांमध्ये कांदळवनाची कत्तल करून विकास प्रकल्प राबवले जात आहेत. वीस हजार चौ.मी. वरील बांधकाम प्रकल्पांना राज्य पर्यावरण विभागाची परवानगी बंधनकारक असताना बिनदिक्कतपणे तेथे इमारती उभ्या राहत आहेत.

दगड खाणीमुळे शहरानजिक असलेल्या अनेक गावांमध्ये लहान मुलांना व ज्येष्ठांना दमा व डोळ्यांचे आजार होत आहेत. तर रेडिमिक्सच्या प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरत आहेत. अनेक पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांवर, विकासकांवर, खासगी व्यक्तींवर एवढेच नव्हे तर महापालिका अधिकाऱ्यांवरदेखील आजपर्यंत पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीनुसार एका-एका व्यक्तीवर १५ ते २० गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कडक कारवाई करणे मात्र टाळले जात आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्य शासनाने याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत लक्षवेधी सूचना आमदार सरनाईक यांनी विधानसभेत मांडली. पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे १ पेक्षा जास्त गुन्हे ज्यांच्या विरोधात आहेत. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का नुसार कारवाई करायला हवी, अशीही मागणी आमदार सरनाईक यांनी या लक्षवेधीमार्फत केली होती.

- Advertisement -

मीरा भाईंदर शहराच्या हद्दीत घोडबंदर, चेना, वरसावे व नागले बंदर या परिसरात असलेले रेडिमिक्स प्लांट व खडी क्रशर प्लांट गावाच्या बाहेर नेण्यात येतील. स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याकडे शासन लक्ष देईल. याप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून त्या परिसराच्या बाहेर हे प्लांट नेण्यात येतील, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केले.

मीरारोड येथील सृष्टी प्रकल्प, तिवारी एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ओस्वाल हाईट्स व यासारखे इतर काही मोठे बांधकाम प्रकल्प, काही इमारती, हॉटेल, क्लब यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर कुठेही पर्यावरण विषयक कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले असेल, आवश्यक त्या परवानग्या घेतल्या नसतील. तर त्यांची सखोल चौकशी करून पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासनही पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

खासगी संस्थांद्वारे पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामे चाललेली असताना शासकीय यंत्रणासुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याचे दिसत आहे. मिरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने अनेक ठिकाणी कांदळवन व सीआरझेड क्षेत्राने बाधित होत असलेल्या जमिनीवर कुठलीही परवानगी न घेता महापालिकेच्या विविध प्रकल्पांबरोबरच ठिकठिकाणी एमएमआरडीएकडून ठेका मिळालेल्या युवक प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची कामे पर्यावरणवाद्यांच्या अनेक तक्रारी येऊन सुद्धा पूर्ण झालेली आहेत. तसेच त्या कामाची युवक प्रतिष्ठान या संस्थेने खोटी बिले सादर केल्यानंतर त्यांची बिलेही अदा करण्यात आलेली आहेत, असेही आमदार सरनाईक यांनी सांगत पर्यावरण मंत्र्यांचे या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले. त्यावर मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रांत युवक प्रतिष्ठानकडून एमएमआरडीए टॉयलेटची नियमबाह्य कामे करण्यात आली. त्यात कांदळवन ऱ्हास केल्याप्रकरणी युवक प्रतिष्ठानची पर्यावरण व गृह विभागा कडून चौकशी केली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्या ज्या ठिकाणी या प्रतिष्ठानने काम केले आहे. त्याची चौकशी करून लवकरात लवकर यावर कारवाई करू, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची रीतसर चौकशी केली जाईल. या चौकशीत चौकशी अहवालाअंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले.

विकास व्हावा पण तो विकास शाश्वत असावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे. जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल किंवा कायद्याचे उल्लंघन होत असेल तर आम्ही त्याच्यावर कडक पावले उचलली आहेत. मीरा भाईंदरच्या कांदळवन ऱ्हास प्रकरणी सखोल चौकशी करू. जिथेही कायद्याचे उल्लंघन झाले असेल तिथे कडक कारवाई करू, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

माजी आमदार नरेंद्र मेहता, सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या अडचणीत?

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित सेव्हन इलेव्हन क्लब, वरसावे सी. एन. रॉक हॉटेलच्या बांधकामात कांदळवनाचा ऱ्हास करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. तसेच या दोन्ही कंपन्यांविरोधात पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे गुन्हेही दाखल आहेत. दुसरीकडे, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानाला मीरा भाईंदर शहरात शौचालये बांधण्याची कामे मिळाली होती. या संस्थेने कांदळनातच शौचालये बांधल्याच्या तक्रारी आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर लक्षेधी सूचना मांडून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर चौकशीचे आदेश निघाल्याने मेहता आणि सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते.  

हेही वाचा –

Booster Dose India: बूस्टर डोससाठी तुमचा नंबर केव्हा येणार? सरकार पाठवणार SMS अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -