जव्हार: वातावरणातील बदल, जंगलातील जनावरांच्या निवार्यावर मानवी अतिक्रमण तसेच अन्न पाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचा वावर हा मानव वस्तीकडे वाढू लागला आहे. यात जव्हार शहरातील सोनारआळी हा परिसर हा जंगल आणि दरीला लागूनच असल्याने येथील घरासमोरच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास जव्हार शहरातील भाग असलेल्या सोनार आळी परिसरात पशुपालक बोराडे यांच्या राहत्या घरामागील दरीतून बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या म्हैशींपैकी एका पारडावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. यात पशुपालकाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाकडून नुकसान भरपाईची मागणी नुकसानग्रस्त पशुपालक सोमनाथ बोराडे यांनी केली आहे.
गत दोन वर्षांपासून अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानव वस्तीकडे वळू लागले आहे, चोथ्याची वाडी, स्मशान भूमी या भागात बिबट्याचा सर्रास वावर होत आहे. त्यामुळे के.व्ही. हायस्कूल आणि गोखले कॉलेज परिसरात अधिक सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले आहे. दरम्यान, जव्हार शहरातील सोनार आळी हा परिसर जंगलव्याप्त व खोल दरीचा भाग असल्याने मागील दहा ते बारा दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. परिसरातील चार ते पाच कुत्र्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्रीच्या सुमारास मानवी वस्तीत शिरकाव करून गोठ्यातील जनावरांवरही हे दोन बिबटे हल्ले करीत आहे. अनावधानाने मानवावरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असून, बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
सोनार आळी या भागात बिबट्याने म्हशीच्या पारड्याला ठार केल्याचे कळाले. त्यानुसार येथील कार्यालयामार्फत पंचनामा करण्यात आला आहे. शिवाय पशुपालकाने देखील नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला आहे. सोनार अळी परिसरात बिबट्या वारंवार येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. त्यानुसार पिंजरा लावण्याकरिता नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयात परवानगीसाठी पत्र पाठविले आहे. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– सैफान शेख, उपवनसंरक्षक, वनविभाग जव्हार