घरपालघरचारोटी येथे महामार्गावरील कट बंद करण्यास स्थानिकांचा विरोध

चारोटी येथे महामार्गावरील कट बंद करण्यास स्थानिकांचा विरोध

Subscribe

कट बंद केल्यावर त्यांना ये -जा करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून चारोटी नाका येथून 1.5 किंवा विवळवेढे (महालक्ष्मी) येथून 2.5 किलोमीटर फेरा मारून यावे लागणार आहे.

डहाणू : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची वाढती संख्या पाहता, त्यावर उपाययोजना म्हणून महामार्गावरून वळण घेण्यासाठी ठेवण्यात आलेले कट बंद करण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे कट बंद करण्यासाठी स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. कट बंद करायचे असतील तर आधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या व त्यानंतर कट बंद करा, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी अल्फा हॉटेलसमोरील कट बंद करण्याचे काम सुरू होते. मात्र, स्थानिकांनी तेथे सुरू असलेले काम बंद पाडले असून, ह्या कामाचा त्यांनी विरोध केला आहे. चारोटी ग्रामपंचायत उपसरपंच कैलास चौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कट बंद करण्यासाठी स्थानिकांचा विरोध केवळ एवढ्या साठीच आहे की, कट बंद केल्यावर त्यांना ये -जा करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून चारोटी नाका येथून 1.5 किंवा विवळवेढे (महालक्ष्मी) येथून 2.5 किलोमीटर फेरा मारून यावे लागणार आहे.

महामार्गावर चारोटी हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा अल्फा हॉटेल व एशियन पेट्रोलपंपच्या परिसरात रस्त्याच्या बसवत पाडा, धापशी पाडा, गावठाण पाडा,तांडेल पाडा या दोन वस्त्या आहेत. येथील अनेकांची शेतजमीन महामार्गापलीकडे असल्यामुळे नागरिकांना नेहमीच महामार्ग ओलांडून पलीकडे जावे लागते. तसेच येथील शाळकरी मुलांना देखील महामार्ग ओलांडून शाळेत जावे लागते आहे. त्यामुळेच रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गावर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठरवून ठराव घेत महामार्ग प्राधिकरणाकडे केली होती. मात्र महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे गांभीर्याने न पाहता लोकांना गृहीत धरत त्याकडे लक्ष दिले नाही. चारोटी ग्रामपंचायतीमार्फत सन 2014 पासून वेळोवेळी ठराव देऊन सुध्दा महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपसरपंच कैलास चौरे करत आहेत. ह्याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे कट बंद करण्याचे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

 

स्थानिकांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांना कामानिमित्त महामार्ग ओलांडावा लागतो तर शाळकरी मुलांना देखील रस्ता ओलांडून शाळा गाठावी लागते. त्यामुळे कट बंद करायचा असेल तर आधी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या व त्यानंतर कट बंद करावे अशी आमची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
– कैलास चौरे
उपसरपंच, चारोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -