मुंबई : मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये येऊन पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केला. मंगळवारी सकाळपासून हे प्रकरण बविआ कार्यकर्त्यांनी चांगलेच लावून धरले. त्यामुळे दिवसभर प्रसारमाध्यमांवरही याच प्रकरणाची चर्चा होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने तक्रार केल्याने आता गुन्हा दाखल झाला आहे. (maharashtra assembly election 2024 fir filed against bjp leaders vinod tawde and rajan naik)
मतदानाच्या आदल्याच दिवशी राज्यात पैसे वाटपाचा प्रकार समोर आला आहे. आणि हा आरोप कुणा कार्यकर्त्यावर नाही तर थेट भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरच हा पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या गोंधळ्या दरम्यान विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, त्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.
हेही वाचा – Attack on Anil Deshmukh Car : गाडीवरील हल्ल्याप्रकरणी अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…
निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तावडे यांच्याविरोधात विरारमधील तुळिंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावडेंसह येथील भाजप उमेदवार राजन नाईक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिडणीस विनोद तावडे आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत 9 लाखांहून जास्त रोकड आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत.
राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आम्ही कायद्याचे पालन करू. असा काही प्रकार नालासोपारा येथे घडतो आहे, हे कळल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचली. आचारसंहितेचे पालन होते आहे की नाही, हे पाहण्यासाठी तयार करण्यात आलेला फ्लाइंग स्क्वॉड देखील लगेच तेथे पोहोचला. या परिसरची पाहणी करून काही रक्कम जप्त देखील केली आहे.
विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बविआ कार्यकर्त्यांनी केल्यानंतर नालासोपाऱ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे नालासोपाऱ्यात भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये भांडणेही पाहायला मिळाली.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : पराभवाच्या भीतीने भाजपाकडून पैसे वाटप, नाना पटोलेंचा हल्लाबोल
विनोद तावडेंचे म्हणणे काय?
पैसे वाटण्याच्या आरोपाचे खंडन करताना विनोद तावडे म्हणाले की, “नालासोपारा मतदारसंघात एक बैठक सुरू होती. त्यात मतदानाच्या दिवशी काय करावे, तसेच आचारसंहितेचे काय नियम आहेत हे सांगण्यासाठी मी गेलो होतो. पण, आमच्या मित्र पक्षांना मी पैसे वाटत असल्याचा गैरसमज झाला. ज्याला या गोष्टीचा तपास करायचा आहे त्यांनी जरूर तपास करावा, निवडणूक आयोगाने देखील याची निःपक्ष चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.” (maharashtra assembly election 2024 fir filed against bjp leaders vinod tawde and rajan naik)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar