मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच राज्यातील विविध भागांमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. संभाजीनगरमध्ये पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर टाकला, तर आता विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा खेळ खल्लास…असे म्हणत ट्वीट केले आहे.
मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक आहे. सगळ्या राजकीय पक्षांचा प्रचार आता थांबला आहे. हा संपूर्ण काळ महत्त्वाचा आहे. अशातच विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना तुम्ही आमच्या मतदारसंघात नेमके का आलात? असा थेट जाब विचारत राडा घातला आहे. यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सोशल मीडियावर ट्वीट केले आहे.
संजय राऊत म्हणतात, जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरांनी केले!
निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, असे म्हणत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
भाजपचा खेळ खल्लास!
जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले!
निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो! pic.twitter.com/BcGKRVSOkj— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2024
या निवडणूक प्रचारात बॅगा तपासण्याचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. उद्धव ठाकरे यांनी वारंवार या मुद्द्याला तोंड फोडले आहे. बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून राऊत म्हणाले होते, उद्धव ठाकरे यांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर या नेत्यांच्या बॅगा आणि हेलिकॉप्टर चेक होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा लावून धरल्याने निवडणूक आयोगाला ही नौटंकी करावी लागत असल्याची टीका राऊतांनी केली होती.
त्यानंतर आता हा पैसे वाटपाचा प्रकार समोर आला आहे. त्यावरूनही संजय राऊत यांनी भाजपावर आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
दरम्यान, तावडेंवर करण्यात आलेल्या आरोपाचं भाजपाने खंडन केलं आहे. तर कारवाई शिवाय सोडणार असा इशारा क्षितीज ठाकूर यांनी दिला आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप मविआकडून करण्यात आला आहे.
याप्रकरणी बविआ प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी येथे वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar