मोखाडा : आदिवासी तालुक्यांमध्ये दिवाळी सण आणि शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्यानंतर, आदिवासी शेतमजूर, भूमीहीन रोजगारासाठी शहराची वाट धरतात. बहुतांश गाव, पाडे, वाडी वस्तीतील मजूर रोजगारासाठी स्थलांतरीत झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर त्याचा मोठा परिणाम होऊन, मतदान घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थलांतरीत मजुरांना मतदानासाठी आणण्याचे मोठे आव्हान उमेदवार आणि कार्यकर्त्यांपुढे ठाकले आहे.
विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटातील गावपाड्यांमध्ये भूमीहीन, शेतमजूर तसेच अल्प जमीन असलेल्या आदिवासींची वस्ती आहे. या भागात शेती व्यतिरीक्त अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. तसेच कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहती नाहीत. येथे सरकारची रोजगार हमी योजना हेच एकमेव शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सुमारे दोन लाखांहून अधिक जॉबकार्ड धारक मजूर संख्या आहे. एकट्या मोखाडा तालुक्यात सुमारे 50 हजारांहून अधिक जॉबकार्ड धारक मजूर आहेत.
खरीपाचे पीक अंतिम टप्प्यात आल्यानंतर हे मजूर बेरोजगार होतात. मजुरांच्या हाताला काम मिळत नाही, म्हणून ते दिवाळी सण सरताच शहराकडे स्थलांतरीत होतात. मजुरांना स्थानिक ठिकाणी काम मिळावे ही सरकारची रोजगार हमी योजना आहे. स्थलांतर थांबावे म्हणून 2 ऑक्टोबरपासून सरकारच्या नरेगा आणि रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. मात्र, यंदा सर्व सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागल्याने, तालुक्यात नरेगाची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. अखेर, बेरोजगार मजूर शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे वाडी, वस्त्या ओस पडल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांमुळे गावपाड्यांतील मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थलांतरीत मजुरांना मतदानासाठी आणण्याचे आव्हान उमेदवार आणि कार्यकर्त्यांपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान, पक्ष कार्यकर्त्यांनी स्थलांतरीत मजुरांची माहिती घेणे सुरू केले आहे. त्यासाठी स्थानिक ठिकाणच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. त्या मजुरांच्या याद्या बनवून ते ज्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत, तेथून त्यांना मतदानासाठी आणण्याच्या नियोजनासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.