मनोज तांबे, विरार : पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे भविष्य २० नोव्हेंबरला मतपेट्यांमध्ये बंद झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात सरासरी 61.23% टक्के मतदान झाले आहे.आता कोण गड राखणार, कोणाचा गड हातातून निसटणार हे येत्या २३ तारखेला ठरणार आहे. बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि आकडेवारीनुसार 61.23 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली.
पालघर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रामधील 128 डहाणू विधानसभा मतदारसंघात 65.52% इतके मतदान झाले आहे. तर 129 विक्रमगड तालुक्यात 66.31% मतदान झाले आहे. 130 पालघर विधानसभा मतदारसंघात 64.00% मतदान झाले आहे. तर 131 बोईसर विधानसभा मतदारसंघात 60.4% मतदान झाले आहे. तसेच 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघात 56.10% मतदान झाले आहे. 133 वसई विधानसभा मतदारसंघात 60.46% मतदान झाल्याची नोंद झाली आहे.तशी माहिती पालघर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ असून एकूण २२ लाख ९२ हजार ६६ मतदार आहेत. यामध्ये ११ लाख ८७ हजार ५८९ पुरुष, तर ११ लाख ४२४६ स्त्रिया आहेत. २३१ तृतीयपंथींयांचा यामध्ये समावेश आहे. पालघर जिल्ह्यामध्ये २१,४१२ दिव्यांग मतदार असून ३२६ सैनिक मतदार आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये २२ लाख ९२ हजार ६६ मतदारांपैकी २० लाख ५ हजार ८७१ मतदारांपर्यंत मतपत्रिकांचे (स्लीप) वाटप करण्यात आले होते. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये २२७८ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सर्वाधिक ५०३ मतदान केंद्रे नालासोपारा मतदारसंघात होती.