भाईंदर : विधानसभा निवडणुकीसाठी मीरा- भाईंदर १४५ विधानसभा मतदारसंघात आज २० नोव्हेंबर रोजी होणार्या निवडणुकीसाठी ५०३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यात यावर्षी ९९ इमारतींमध्ये ५०३ मतदान बूथवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आहेत व ज्येष्ठ नागरिकांना विना रांगेशिवाय जाऊन मतदान करायचे आहे. तर यात कुठेही चुकीची घटना घडू नये म्हणून मीरा- भाईंदर मतदार संघासाठी ३५०० प्रशासकीय कर्मचारी, १५०० पोलीस अधिकारी कर्मचारी, दोन दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदारांना प्रत्येक मतदान केंद्राजवळ मतदान सहायता केंद्र, प्रतीक्षा मंडप आणि त्यात पिण्याचे पाणी अशी व्यवस्था केली आहे. तर मतदान केंद्रात दोन मोठे टेबल पंखे लावलेले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ कार्यक्रम जाहिर केलेला असून १५ ऑक्टोबर पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. आज २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मीरा- भाईंदर वसई-विरार आयुक्तालय हे पालघर व ठाणे जिल्हा या दोन लोकसभा मतदार संघाने विभाजीत असून त्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. मीरा- भाईंदर १४५ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्यात १३१ बोईसर, १३२ नालासोपारा, १३३ वसई व ठाणे जिल्हयात १४५ मीरा भाईंदर, १४६ ओवळा माजिवाडा असे एकूण पाच विधानसभा मतदार संघ येतात. पाच विधानसभा मतदार संघात ४४९ इमारतीत १७७६ बुथ येथे मतदान प्रक्रिया होणार आहे. पोलीस आयुक्तालयात कार्यक्षेत्रात ५ पोलीस उप आयुक्त, १२ सहाय्यक पोलीस आयुक्त, ३८६ पोलीस अधिकारी, २८४० पोलीस अंमलदार, ८७ पोलीस सेक्टर व पेट्रोलींग, १२५० होमगार्ड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व विशेष सशस्त्र पोलिसांच्या ५ कंपनी, राज्य राखीव पोलीस दलाची १ कंपनी व ८८ नागरी संरक्षण स्वयंसेवक असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.