HomeपालघरMahavitaran: पंचवीस दिवसापासून वीज ग्राहक केंद्र बंदच

Mahavitaran: पंचवीस दिवसापासून वीज ग्राहक केंद्र बंदच

Subscribe

त्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. मागील २५ दिवसांपासून निविदा प्रक्रियेच्या विलंबामुळे वीज ग्राहक केंद्र बंद आहे.

वसई : वसई विरार शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि विविध कामांच्या मदतीसाठी महावितरणच्या वसई मंडळ कार्यालयाच्या बाजूला वीज ग्राहक सेवा सुरू केंद्र तयार करण्यात आले होते. मात्र निविदा प्रक्रियेच्या विलंबामुळे ही केंद्रे २५ दिवसांपासून बंद पडले आहे. वसई- विरार शहरातील वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा व त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणकडून वीज ग्राहक सुविधा केंद्र तयार केली आहेत. या ग्राहक सुविधा केंद्रामार्फत नवीन वीज पुरवठा देणे, वीज देयकावरील नाव बदलणे व अन्य दुरुस्ती, वाढीव वीज भार, वीज देयक तक्रार निवारण, वीज देयक काढून देणे अशा विविध सेवा पुरविल्या जात होत्या. मात्र यापूर्वी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा ठेका हा ३० नोव्हेंबरपासून संपुष्टात आल्याने १ डिसेंबर पासून हे ग्राहक सुविधा केंद्र बंद करण्यात आले असल्याचे निदर्शनास आढळून आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. मागील २५ दिवसांपासून निविदा प्रक्रियेच्या विलंबामुळे वीज ग्राहक केंद्र बंद आहे.

वसई तालुक्यातील वीज ग्राहकांच्या सुविधेसोबतच या ठिकाणी काम करणारे कर्मचारी ही घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या केंद्रात २० ते २५ कर्मचारी काम करीत होते. लवकर याबाबत निर्णय घेऊन पुन्हा एकदा आम्हाला सेवेत रुजू करून घ्या अशी मागणी कर्मचारी यांनी केली आहे. ग्राहक केंद्र चालविण्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त केला जाणार होता. यासाठी महावितरणने निविदाही काढली होती. यात पाच ठेकेदारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील तीन ठेकेदार अपात्र ठरले तर दोन जण पात्र ठरले आहेत.अजूनही या निविदेचा तिढा सुटला नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. मात्र या केंद्रातून ज्या सेवा ग्राहकांना दिल्या जात होत्या त्या सद्यस्थितीत विभागीय कार्यालयातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही महावितरणने सांगितले आहे.या केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar