Homeपालघरमंडळ अधिकारी, तलाठ्याला लाच घेताना अटक

मंडळ अधिकारी, तलाठ्याला लाच घेताना अटक

Subscribe

तसेच तक्रारदारांच्या चुलत भाऊ बहिणीच्या जमिनीच्या सातबारावरील नावामध्ये बदल करण्यासाठी तक्रारदाराने तहसीलदार वाडा यांच्या कार्यालयात केलेल्या अर्जाची चौकशी मंडल अधिकारी यांच्याकडे केली होती.

वाडा: तालुक्यातील कोनेचे मंडळ अधिकारी किरण राठोड आणि कोने सजाच्या तलाठी चैत्राली कुटे यांना अनुक्रमे 25 आणि 5 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार 30 जानेवारी )सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाई मुळे महसूल कर्मचार्‍यांत प्रचंड खळबळ माजली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या जमिनीच्या सातबारावरील मयत नातेवाईकांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे नोंदवण्यासाठी तक्रारदाराने तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता. तसेच तक्रारदारांच्या चुलत भाऊ बहिणीच्या जमिनीच्या सातबारावरील नावामध्ये बदल करण्यासाठी तक्रारदाराने तहसीलदार वाडा यांच्या कार्यालयात केलेल्या अर्जाची चौकशी मंडल अधिकारी यांच्याकडे केली होती.

वरील प्रमाणे दोन्ही कामे करण्यासाठी मंडल अधिकारी यांनी 25 हजार तर तलाठी यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळच्या सुमारास सापळा रचून दोघांना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही यशस्वी कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार दीपक सुमडा, अमित चव्हाण, संजय सुतार, नवनाथ भगत, नितीन पागधरे, योगेश धारणे, विलास भोये, निशीगंधा मांजरेकर, जितेंद्र गवळे, सखाराम दोडे यांच्या पथकाने केली.