भाईंदर :- काशीमीरा येथे श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगता कार्यक्रमाला मंगळवारी मनोज जरांगे- पाटील उपस्थित राहणार असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक सुभाष काशिद यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या उपोषणानंतर त्यांच्यावर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. दिवाळी सण साजरा झाल्यावर जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात दौरा सुरू केला आहे. या दौर्यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. मीरा-भाईंदरमध्येही येणार आहेत.
मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी काशीमीरा येथील जरीमरी गावदेवी मंदिरात श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणीही जरांगे- पाटील उपस्थित राहणार आहेत. मीरा- भाईंदर शहरात मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने राहत आहेत. येथील नागरिक देखील आरक्षण मिळण्यासाठी सुरुवातीपासून प्रत्येक आंदोलनात सहभाग असतो. जरांगे पाटील मीरा -भाईंदर मध्ये येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाचे नेते जोरदार तयारी करत असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक व सकल मराठा समाजाचे समन्वयक सुभाष काशिद यांनी सांगितले आहे.