मनोर-वेळगाव रस्ता धोकादायक; दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मनोर वेळगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मनोर वेळगाव रस्ता दुरुस्ती रखडली

मनोर वेळगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील दोन साकव पूल कोसळले असून एका ठिकाणी मोरीला भगदाड पडले आहे. त्यामुळे मनोर वेळगाव रस्ता धोकादायक झाला आहे. ग्रामस्थांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे. वेळगाव रस्ता मनोर शहर आणि चिल्हार बोईसर रस्त्याला जोडणारा रस्ता म्हणून ओळखला जातो. औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारे कामगार या रस्त्याचा वापर करतात. वेळगाव रस्त्यावरील अंभाण, बांधण, कोंढान आणि दामखिंड या आदिवासीबहुल गावातील ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतात. वेळगाव रस्त्यावरील वेळगाव फाटा ते खुशी आंगन कॉम्प्लेक्स भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. वेळगाव रस्त्यावर लालबहादूर शास्त्री हायस्कूल आणि मंडळ अधिकारी कार्यालय असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावर होत असते.

मनोर वेळगाव रस्त्याच्या दुरुस्ती आणि साकव पुलासाठी १८ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ४१ लाखांच्या उपलब्ध निधीतून पाचशे मीटरचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
– हेमंत भोईर, अभियंता (बांधकाम विभाग), पंचायत समिती, पालघर

मनोर शहरात वेळगाव फाट्यापासून आंबेडकर नगर, खुशी आंगन ते एचपी गॅस गोदाम पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील जीर्ण झालेले साकव पूल कोसळले असून एका ठिकाणी मोरीला भगदाड पडले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वाहनचालक आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बांधण गावानजीकचा साकव पुल जीर्ण झाल्याने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पुलाचा अर्धा भाग कोसळला होता. पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोसळलेला उर्वरित साकव पूल पाडून पुलाच्या जागी पाईप आणि माती भराव करून वाहतूक सुरू करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या पुरामुळे पुलावरील माती भराव वाहून गेल्याने आठवडाभर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सिमेंट पाईपवर तात्पुरत्या स्वरुपात माती भराव करून टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा –

अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारतीसह तिघांविरुद्ध गुन्हा