कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा

अशा घोषणा देत मोर्चे करी मनोर पोलीस ठाण्यावर धडकले होते. ढेकाळे गावातील आदिवासी शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करा आणि आदिवासींवर अत्याचार करणार्‍या अधिकार्‍यांचे निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नजीम खतिब, मनोर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनोर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. बुधवारी दुपारी माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि माकप कार्यकर्त्यांचा सहभाग होता.पोलीस प्रशासन मुर्दाबाद,दादागिरी बंद करा अशा घोषणा देत मोर्चे करी मनोर पोलीस ठाण्यावर धडकले होते. ढेकाळे गावातील आदिवासी शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करा आणि आदिवासींवर अत्याचार करणार्‍या अधिकार्‍यांचे निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मनोर शहराच्या पूर्वेकडील हात नदी किनारच्या मैदानावर माकप कार्यकर्ते एकत्र जमू लागले होते.दुपारी एक वाजताच्या सुमारास हात नदी मैदानावरून मोर्चेकरी चालत मनोर पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले होते.मनोर बाजारपेठेतील रस्त्यावरून घोषणाबाजी करीत मोर्चा मनोर पोलीस ठाण्यात दाखल झाला.मनोर पोलीस ठाण्यासमोर पोहोचल्यावर आमदार विनोद निकोले पोलीस ठाण्यासमोर जमिनीवर बसत सर्वच मोर्चेकर्‍यांना खाली बसवले.मोर्चेकरी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून बसल्याने रस्ता बंद केला होता.मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. गांजे गावातील आदिवासी शेतकर्‍यांच्या जमिनींचा गेल्या महिन्यापासून वाद सुरू होता. विवादित जमिनीवर माकप पक्षाचे झेंडे लावले होते. झेंडे काढण्यासाठी आलेल्या पोलिसांनी माघारी जात असताना जमिनीपासून लांब असलेल्या शाळेचा पाडा येथे थांबलेल्या पाड्यातील आदिवासी महिलांचा पाठलाग करून मारझोड केली. तसेच तरुणाला मारझोड केल्याचा आरोप पोलिसांविरोधात करण्यात आला.

पोलीस प्रशासनाच्या अन्यायकारक कारभारामुळे सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी जनतेला त्रास होत असेल तर आजचा मोर्चा हा देखावा आहे. जर या अन्यायकारक घटनेवर आळा बसला नाही तर पुढे जाऊन हा मोर्चा पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यालयावर काढण्यात येईल आणि तो मोर्चा भव्य मोर्चा असेल.
– विनोद निकोले
आमदार,डहाणू