घरपालघरमंडप, डेकोरेटर, हॉलचालक संकटात

मंडप, डेकोरेटर, हॉलचालक संकटात

Subscribe

लॉकडाऊननंतर दोन-तीन महिने दिलासा मिळाला असताना आता ऐन लग्नसराईच्या दिवसातच पुन्हा लॉकडाऊन येऊन कडक निर्बंध लादले गेल्याने जिल्ह्यातील मंडप, डेकोरेटर, हॉलचालक, फुल विक्रेते संकटात सापडले आहेत.

लॉकडाऊननंतर दोन-तीन महिने दिलासा मिळाला असताना आता ऐन लग्नसराईच्या दिवसातच पुन्हा लॉकडाऊन येऊन कडक निर्बंध लादले गेल्याने जिल्ह्यातील मंडप, डेकोरेटर, हॉलचालक, फुल विक्रेते संकटात सापडले आहेत. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केला आहे. तर कित्येक हॉलचालकांनी हॉल वर्षभरासाठी भाड्याने घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा उभे ठाकल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे. तर या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायिकही देशोधडीला लागण्याची श्यक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीचा लग्नाचा हंगाम कोरोनाच्या महामारीमुळे वाया गेला होता. दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लग्नसराईत थोडेफार उभे राहता येईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऐन लग्न सराईतच लग्न समारंभावर अनेक निर्बंध आले आहेत. त्याचा फटका मंडप डेकोरेटर, साउंड सिस्टिमवाले, सोनार, कपड्याचे दुकानदार, जेवण, मिठाईवाले, बँडवाले, बँज्योवाले व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, पाणीवाले, हार, फुले, विकणारे, डेकोरेटर आणि मद्यविक्रेतांसह लग्नसराईवर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.

लग्नसमारंभावर आलेल्या बंधनाचा फटका हॉलवाल्यांनाही बसला आहे. आम्हाला ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नासाठी हॉल देणे परवडत नाही. आता फक्त २५ लोकांचे बंधन घालण्यात आले आहे. लोकांची उपस्थिती वाढल्यास आमच्यावर दंडात्मक कारवाई होत असल्याने हॉल भाड्याने देण्याचे नाकारले जात आहे. ज्यांना तारखा दिल्या आहेत, ते बुकींग रद्द करीत आहेत. त्यामुळे हॉलचे भाडे, खर्च, लाईटबिल, कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते, घरखर्च कसा करायचा याची चिंता आहे.
– कैलास पाटील, हॉलचालक, वसई

- Advertisement -

वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नात ५० जणांची उपस्थितीची अट होती. त्यातही व्यावसायिक थोडाफार का होईना आर्थिक हातभार लागेल या उद्देशाने काम करीत होते. आता लग्नसराई सुरु झाली असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहिर करून कडक निर्बंध लादले आहेत. लग्नासाठी आता फक्त २५ जणांचीच अट घातली आहे. त्यातही इतर असंख्य निर्बंध असल्याने त्यातून व्यावसायिकांना काहीच फायदा होणार नाही.

लग्न समारंभाबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिचन लोकांचे कॅमिनियन (लहान मुलांना ख्रिचन धर्माची दीक्षा देणे) असतात. वसईत तालुक्यातील चर्चेसमध्ये किमान सातशे ते आठशेच्या दरम्यान विधी होतात. दिक्षा समारंभ विवाह समारंभासारखेच अगदी थाटामाटात केले जातात. पण, त्यावरही बंधने आल्याने यात गुंतलेल्या शेकडो व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीमुळे फुल व्यवसायाला फटका बसला आहे. गेल्यावर्षीचा लग्नाचा सिजन, मुंज, पूजा, मंदिरे बंद असल्याने तसेच ठिकठिकाणच्या यात्रा रद्द झाल्याने नाशिवंत असलेल्या फुलाला मागणी नव्हती. यावर्षी लग्न सिजन, यात्रा चांगल्या जाऊन हातात पैसे येऊन घेतलेले कर्ज फेडता येईल असे वाटले होते. परंतु पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे फुल शेतकरी उध्वस्त होणार आहे. तसेच याठिकाणी भाजीपाला उत्पादकांनाही त्याचा फटका बसणार आहे.
– सुभाष भट्टे (वसंतराव नाईक फुलशेती पुरस्कार प्राप्त शेतकरी)

गेल्यावर्षी मंडप डेकोरेटरनी कसे तरी आपल्याजवळील कामगारांना सावरले होते. परंतु आता पुन्हा लग्न समारंभावरच बंधने आल्याने त्यांचे कंबरडे मोडणार आहे. लॉकडाऊनच्या भीतीने आता कामगार गावी जाऊ लागले आहेत. लॉकडाऊनमुळे आगामी मिळालेली बुकींग रद्द होऊ लागली आहेत. त्यामुळे कर्जाचा डोंगर कसा पेलायचा, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे.

गेल्यावर्षी आमच्या व्यवसायाला कोरोनामुळे करोडो रुपयांचा फटका बसला आहे. शेकडो व्यावसायिक अवलंबुन असून गेले वर्षभर तग धरून होते. यावर्षी त्याची भरपाई करता येऊन पुन्हा नव्या उमेदीने उभे राहता येईल असे वाटले होते. परंतु पुन्हा एकदा कोरोनाचा फटका आम्हाला बसणार आहे. शासनाने आता आम्ही या व्यवसायिकांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केल्यास त्याचा दिलासा मिळेल.
– कांती मानकर, डेकोरेटर, वसई

हेही वाचा –

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -