बोईसर : जिल्ह्यातील कुपोषण, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबवल्या जात असतानाच जिल्ह्यातील ११ वर्षात १५६ महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूच्या विळख्यात सापडलेल्या पालघरच्या ग्रामीण भागात शनिवारी (ता.२६ डिसेंबर) एका मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे मातामृत्युसारखे गंभीर प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. बालमृत्यूसोबत मातामृत्यूचे प्रमाण पालघर जिल्ह्यात लक्षणीय आहे. जिल्हा स्थापन २०१४ पासून ते आतापर्यंत पालघर जिल्ह्यात १५६ मातांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सर्वाधिक माता मृत्यू २०२१ – २२ या वर्षात झाले आहेत. या वर्षात पालघर जिल्ह्यात वीस (२०) मातांचा मृत्यू झाला होता. माता मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पालघर तालुक्यात दिसून येते. त्या खालोखाल डहाणू, जव्हार व विक्रमगड तालुक्यात माता मृत्यूची संख्या लक्षणीय आहे.
मुदतपूर्व प्रसूती, अल्पवयीन वयात विवाह, शारीरिक समस्या यासह गर्भधारणेच्या समस्या अशा विविध समस्यांमुळे जिल्ह्यात या मातांचा मृत्यू झालेला आहे. योग्य तो पोषण आहार न मिळाल्यामुळेही मातांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी, परंपरा आजही कायम आहेत. त्यामुळे अशा प्रकारांमुळे लहानपणीच शारीरिक अडचणी निर्माण झाल्याने स्तनदा व गरोदर मातांचे मृत्यू होत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. माता मृत्यू होऊ नये यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत कल्याणकारी योजना, सकस आहार, एपीजे अब्दुल कलाम आहार योजना अशा अनेक विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यानंतरही माता मृत्यू कायम आहे. २०२४ मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातत तब्बल ११ मातांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे.
मोखाडा येथे ब्लड स्टोरेज युनिट स्थापनेचा प्रस्ताव आहे. जिथे रिक्त जागा आहेत तिथे तात्काळ तज्ञांची
नियुक्ती करणार. तसेच रक्तस्राव ,सिकलसेल,इन्फेक्शन जनमजात आजार या आणि अन्य कारणांमुळे मृत्यू होत असतात.
– रामदास मराड , जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर