भाईंदर : मीरा -भाईंदर महानगरपालिका कर विभागाने सन २०२४-२५ या वर्षातील १ एप्रिल ते २३ डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता कर धारकांकडून आतापर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने १९१ कोटी ४८ लाख ७७ हजार ७४० रुपये वसुली केली आहे. तर गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६ कोटी रक्कम जास्त वसूल झाली आहे.तसेच यावर्षीचे उद्दिष्ट २८१ कोटी एवढे महापालिकेने ठेवले आहे.मीरा -भाईंदर शहरात ३ लाख ५० हजार रहिवाशी निवासी मालमत्ता आणि ५५ हजार ९८७ व्यावसायिक मालमत्ता अशा एकूण ३ लाख ७५ हजार मालमत्ता आहेत. मीरा -भाईंदर महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात १९३ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली होती. शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेने मालमत्ता कर भरणार्या करदात्यांना करात ३१ जुलैपर्यंत पाच टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे नियमित मालमत्ता कर भरणारे नागरिक या सवलतीचा फायदा घेताना दिसत होते.
महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी १ एप्रिलपासून ऑनलाईन बिले सुरू करून ती लगेच मालमत्ता कर धारकांना वितरीत करण्याचे देखील काम सुरू केले होते. आतापर्यंत ३ लाख ७५ हजार बिले वितरित करण्यात आली आहेत. यंदा लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुका असल्या तरी महापालिकेने मालमत्ता कर वसुली नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवलेली आहेत. तसेच बराच मालमत्ता कर हा ऑनलाईन देखील भरला जात आहे. या निवडणुकीचा मालमत्ता कर वसुलीवर मोठा परिणाम होईल असे बोलले जात होते. परंतु शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा अधिक सुलभरित्या करण्याकरीता महानगरपालिकेने ऑनलाईनव्दारे तसेच ऍपव्दारे मालमत्ता कराचा भरणा करणेकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असून त्यानुसार आतापर्यंत नागरिकांनी ऑनलाईनव्दारे रु. १९१ कोटी ४८ लाख एवढ्या रक्कमेचा भरणा केलेली आहे.
ज्या मालमत्ता धारकांना ३० जूनपर्यंत संपूर्ण रक्कमेचा भरणा केल्यास ५ टक्के सूट व ३१ जुलै पर्यंत संपूर्ण रक्कमेचा भरणा केल्यास ३ टक्के सूट देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आतापर्यंत २ लाख ६९ हजार ७१९ इतक्या नागरिकांनी यात ऑनलाईन करभरणा १ लाख २७ हजार १०२ नागरिकांनी ९२ कोटी ८२ लाख ३३ हजार ३४५ कर भरणा आणि ऑफलाईन १ लाख ४२ हजार ६१७ मालमता धारकांनी ९८ कोटी ६६ लाख ४४ हजार ९५ रुपये असा एकूण १९१ कोटी ४८ लाख ७७ हजार ४४० रुपये इतका कर महापालिका तिजोरीत जमा झाला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त प्रसाद शिंगटे आणि सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे यांनी दिली आहे.
तर उर्वरीत मालमत्ता धारकांनी ३१ मार्च पूर्वी व शक्य तितक्या लवकरात लवकर मालमत्ता कराचा भरणा करुन महापालिकेच्या विकासासाठी आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संजय काटकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.