भाईंदर : मीरा -भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरातील पडीक बेवारस वाहनांवर कारवाईच्या नोटिसा लावून ४८ तासांची मुदत देत कारवाई करण्यात येणार आहे. पडीक बेवारस वाहने ही भाईंदर पश्चिमेच्या रेल्वे स्टेशन रोड बालाजी नगर, पालिका मुख्यालय जवळ तसेच भाईंदर पूर्वेच्या सुभाष नगर, इंद्रलोक, रामदेव पार्क व कनकिया यांसारख्या अनेक परिसरांत रिक्षा व चारचाकी वाहने धूळ खात पडून आहेत. यामुळे वाहन मालकांच्या निष्काळजीपणामुळे पडीक वाहने रस्त्यावर दिसून येत आहेत.
प्रभाग क्रमांक दोन, तीन आणि चार मार्फत रस्त्यावर धूळ खात पडून असणार्या १०० हून अधिक पडीक वाहनांना नोटिसा बजावत ४८ तासांच्या मुदतीनंतर ४५ वाहने कर्षण करून उचलण्यात आली होती. मात्र प्रभाग क्रमांक १ मध्ये बालाजी नगरजवळ युनियन बँकेच्या समोरच गेल्या एक दीड महिन्यांपासून पडीक वाहने पार्क केली आहेत. तर महापालिका मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या शाळेच्या गल्लीजवळ रिक्षा पडून आहेत. प्रभाग ४ मध्ये सुभाष नगर परिसरात टाटा डोकोमोजवळ एका मोकळ्या प्लॉट बाहेर गेल्या २ महिन्यांपासून एक दोन पडीक रिक्षा बिना चाकांची रस्त्यावर धूळ खात पडून असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रस्त्याच्या शेजारी जागा अडवून उभ्या असलेल्या रिक्षाची पालिकेमार्फत हकालपट्टी होणार का व शहरातील ट्रॅफिक समस्या कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मीरा- भाईंदर शहरातील रस्ते, पदपथ, उद्याने आदी सार्वजनिक जागांवर अनेक वाहने भंगार अवस्थेत, नादुरुस्त, धूळखात पडून असतात. या वाहनांमुळे रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो. यामुळे पालिका त्यांची हकालपट्टी करते. मात्र ही वाहने गोडाऊन बाहेरच रस्त्यावर वाटेल तशी ठेवल्याने दैनंदिन साफसफाई देखील पालिका कामगारांना करता येत नाही. परिणामी तेथे अस्वच्छता कायम राहते. प्रभागात पडीक बेवारस धूळखात असणारी वाहने आढळतील आशा या पडीक – बेवारस वाहनांवर नोटीस लावण्यात येते.तसेच ४८ तासांत वाहन काढून घ्या, अन्यथा पालिका वाहन टोईंग करून नेणार आहे, असा इशारा देत नोटीस प्रसिद्ध करण्यात येते. पालिकेने जप्त केलेली वाहने ८ दिवसात संबंधित मालकाने वाहन सोडवली तर दुचाकी वाहनांसाठी १२०० रु. आणि चारचाकीसाठी ३००० हजार रुपये दंड भरावा लागतो. ८ दिवसांनंतर देखील वाहन सोडवले नाही, तर प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची नोंदणी रद्द करून त्याचा ई लिलाव केला जातो. मात्र आजवर पालिकेकडून अशाप्रकारची कोणतीही ठोस कारवाई झालेली बघण्यास मिळालेली नाही.