भाईंदर : मीरा- भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी शहरात वॉक विथ कमिशनर सारखीच संकल्पना राबवत शहरातील विविध समस्या व विकासकामांची पाहणी सुरू केली असून त्यात त्यांनी २० डिसेंबर रोजी सकाळी मीरारोड स्टेशन येथील पे अँड पार्क, मीरारोड भाजी मार्केट, इंदिरा गांधी रुग्णालय, भाईंदर पश्चिम येथील बस डेपो जागा आणि बंदरवाडी स्मशान भूमी याठिकाणी स्थळ पाहणी करून आढावा घेतला.
शुक्रवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेल्या पाहणी दौर्यात आयुक्तांनी सर्व ठिकाणी नियमितरीत्या स्वच्छता ठेवण्याच्या सूचना संबधित अधिकारी आणि कर्मचार्यांना दिल्या. मीरारोड स्टेशन येथील पे अँड पार्क ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची आयुक्तांनी ठेकेदारास सक्त ताकीद दिली व परिसरात अस्वच्छता दिसल्यास संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश स्वच्छता अधिकार्यांना दिले. इंदिरा गांधी रुग्णालयातील तिसर्या आणि चौथ्या मजल्यावरील बांधकामाची आयुक्तांनी पाहणी केली. कार्यादेश दिल्याप्रमाणे ठेकेदाराने कामे पूर्ण केली आहेत की नाही याबाबतही आढावा घेतला. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
त्यानंतर आयुक्तांना भाईंदर पश्चिम येथील बस डेपोची आरक्षित असलेल्या जागेची पाहणी केली .त्यावेळी त्यांनी जागेबाबत लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित बांधकाम विभागाला दिले. भाईंदर पूर्वेच्या बंदरवाडी स्मशानभूमी येथे पाहणी करताना आयुक्तांनी स्मशानभूमी परिसरातील नीटनेटकेपणा व स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले आणि तेथील कर्मचार्यांचे अभिनंदन केले. तसेच स्मशानभूमीत उपलब्ध असलेली पाणपोई व्यवस्था स्वच्छ किंवा दुरुस्त करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. यावेळी सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, स्वच्छता निरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.