भाईंदर : मीरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात बेकायदेशीर फेरीवाले आपला धंदा करत आहेत.थेट रेल्वे स्थानक परिसर, स्काय वॉक, पदपथ आणि नागरिकांना चालणारे हक्काचे रस्ते यावर अतिक्रमणे सुरू असतात.त्यामुळे एकप्रकारे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात आहे.त्यात फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून एकाची नया नगरमध्ये गोळी झाडून हत्या झाली होती.या सर्व रक्तरंजित घटनेनंतर पालिकेला उशिरा शहाणपण सुचले आहे.कारण काही हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर ६ जानेवारी रोजी मीरा- भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक ५ अंतर्गत मीरारोड स्टेशन परिसरात गाळ्यासमोरील अनधिकृत छप्पर, हातगाड्या, अनधिकृत पान टपर्यांवर कारवाई करण्यात आली. त्या कारवाई दरम्यान ६२ हातगाड्या, अनधिकृतपणे बनवण्यात आलेल्या ६ गाळ्यांच्या समोरील छपरांवर, एक पान टपरी व एक गाळा यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने महापालिका अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली आहे. मीरा- भाईंदर शहरात राहणारे नागरिकांपेक्षा जास्त नालासोपारा, वसई, विरार, दहिसर व बोरीवली भागातून दररोज येऊन व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. यात स्थानिक फेरीवाले व बाहेरील फेरीवाले हे महिना मोक्याच्या जागांना २० हजार भाडे आणि गल्लीबोळात १० -१२ हजार भाडे हप्ता रुपी देतात. नया नगरमध्येही सहा ते साडेसहा हजार फेरीवाल्यांचा एक प्रमुख असतो. त्यात तो कारवाई अगोदर सूचना देऊन फेरीवाल्यांना पळवून लावतो. येथे युसूफ नावाचा माणूस तिथला प्रमुख आहे.
ठिकाणी कारवाई होणे गरजेचे
भाईंदर पूर्वेच्या राहुल पार्क, नवघर रोड, बी.पी.रोड, इंद्रलोक नाका, भाईंदर पश्चिमेच्या ९० फुटी रोड, ६० फुटी रोड, भाईंदर स्टेशन रोड, शिवसेना गल्ली जवळ, जैन मंदिर, मिरारोडमधील शांती नगर, शांती पार्क, आर.एन.ए. ब्रॉडवे समोर, विजय पार्क, सिल्वर पार्क, पूनम सागर मिरारोड स्टेशन आणि नया नगर काशीमिरा नाका येथे कारवाई होणे गरजेचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक परिसर १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. त्याचे पालन पालिकेकडून होत नाही. तसेच नागरिकांना रस्त्याने चालण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेले पदपथे मोकळे ठेवावेत. जेणेकरून त्रास होणार नाही असे सक्त आदेश असतानाही पालिकेकडून मात्र बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करायचे सोडून अभय देण्याचे काम चालू आहे.
– सजी आई.पी., समाजसेवक, मीरारोड