भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिकेने सर्व विभागात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली आहे. महापालिकेने सर्व कारभार पेपरलेस केला असून स्वतंत्र ई- ऑफीस विभागाची स्थापनासुद्धा केली आहे. सर्व विभागांचा कारभार हा पेपरलेस करणारी मीरा- भाईंदर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यामुळे महापालिकेला केंद्र शासनाच्या एनआयसी विभागाकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मीरा- भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामातील पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी, गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी ई- ऑफिस प्रणालीची नोंदणी करून १५ दिवसांमध्ये संगणक व उद्यान विभागाचे कामकाज ई-ऑफिस पद्धतीने सुरू करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्याने इतर विभागांचे कामकाज ई-ऑफीस प्रणालीने सुरू करून १६ ऑक्टोबरपासून सर्व विभागांचा कारभार पेपरलेस करण्यात आला आहे. ई-ऑफिस प्रणाली राबवण्यासाठी उपायुक्त संजय शिंदे आणि सिस्टम मॅनेजर राज घरत यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र ई- ऑफीस विभागाची स्थापनासुद्धा करण्यात आली आहे. ई- ऑफीस प्रणालीबाबत वर्ग १ ते वर्ग ३ मधील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना एनआयसीच्या तांत्रिक कर्मचार्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले.