घरपालघरमीरा-भाईंदरमध्ये पहिल्याच पावसात उडाली दैना

मीरा-भाईंदरमध्ये पहिल्याच पावसात उडाली दैना

Subscribe

तर क्वीन्स पार्क येथील एका बंगल्याच्या परिसरात विजेचा करंट उतरला होता .मात्र त्यावेळी नागरिकांनी घेतलेल्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

भाईंदर :- गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला. परंतु पहिल्याच दिवशी मीरा-भाईंदर शहरात शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचले. तर शहरातील रस्ते देखील जलमय झाले होते. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. यातून काही सखल भागात पाणी साचले होते, तर नालेसफाई झाली नसल्यानेच पाणी तुंबल्याचे बोलले जात आहे. मीरा-भाईंदर शहरात शनिवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती .सायंकाळच्या वेळी पावसाने जोर पकडल्याने शहरात अनेक भागात पाणी साचले होते. काशिमीरा परिसरातील डेल्टा गार्डन ते मीरा रोड स्टेशन रोड रस्ता जलमय झाला होता. शीतल नगर, शांतीनगर या परिसरातील दुकानांमध्ये व तळ मजल्यावरील घरामध्ये पाणी शिरले होते. तसेच भाईंदर पूर्वेचे बीपी रोड, केबिन रोड, भाईंदर पश्चिमेची बेकरी गल्ली हे रस्ते जलमय झाले होते. मोरवा येथे तर रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारात कार फसली होती. राई- मोरवा मार्गावर तुडुंब पाणी भरल्याने रस्ता पाण्याखाली गेला होता. नया नगरमधील बाणेगर शाळा, हैदरी चौक, गीता नगर फेज २, कानुंगो इस्टेट परिसरात पाणी तुंबले होते. सुंदर नगर या सोसायटीच्या गेटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना घरी जाताना त्रास सहन करावा लागत होता. तर क्वीन्स पार्क येथील एका बंगल्याच्या परिसरात विजेचा करंट उतरला होता .मात्र त्यावेळी नागरिकांनी घेतलेल्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

महापालिकेने करोडो रुपये खर्च करून नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. परंतु नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्यामुळेच पहिल्या पावसातच शहर जलमय झाल्याचा नागरिकांनी आरोप करत महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उत्तन रोडवरील मोरवा गावाजवळ एक कार खड्ड्यात अडकली. तो रस्ता पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होता.रस्त्यावर अपघात होऊ नये व रस्ते अपघात टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने पावसाळ्यात रस्ते खोदण्यास बंदी घातलेली आहे. तरीही अनेक भागात रस्ते खोदलेले दिसत आहेत. त्याठिकाणी वाहनचालक व पादचार्‍यांना धोक्याची सूचना देण्यासाठी कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी देखील सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी देखील अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -