घरपालघरमीरा -भाईंदर मेट्रो कारशेडचं ठरलं

मीरा -भाईंदर मेट्रो कारशेडचं ठरलं

Subscribe

पण विरोधकांनी गोंधळ घातल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात आमदार सरनाईक यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली.

इरबा कोनापुरे,भाईंदर : भाईंदरच्या राई मोर्वा मुर्धा येथील स्थानिक जनतेचा नियोजित मेट्रो कारशेडला तीव्र विरोध असल्याचा मुद्दा नागपूर येथे सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सरनाईक यांनी आज उपस्थित केला. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन आमदार सरनाईक यांची मागणी मान्य केली आहे. भाईंदर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळून पुढे उत्तनपर्यंत मीरा भाईंदरची मेट्रो नेली जाणार असून उत्तन येथे राज्य सरकारच्या शासकीय जमिनीवर मीरा- भाईंदर मेट्रो कारशेड बनवण्यात येईल , असा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चेनंतर नागपूर येथे घेतला.
भाईंदरच्या मोरवा , राईमुर्धे व मुर्धे गावात स्थानिकांचा विरोध असताना मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकण्यात आल्याबाबतचा मुद्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले व सभागृहात या मुद्द्यावर चर्चाही होणार होती. पण विरोधकांनी गोंधळ घातल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात आमदार सरनाईक यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार सरनाईक यांची मागणी मान्य करीत मेट्रो कारशेड उत्तन येथे बनवण्याचा निर्णय घेतला.

मीरा- भाईंदर मेट्रोचे काम सुरु असून मेट्रो कारशेडचा विषय गेले काही महिने चर्चेत आहे. स्थानिकांची वर्षानुवर्षे असलेली घरे तोडून किंवा त्यांच्या शेत जमिनीवर , त्यांच्या जमिनीवर हे कारशेड करण्यास विरोध असल्याने आमदार सरनाईक यांनी सातत्याने येथील भूमिपुत्रांची बाजू सरकार दरबारी व अधिवेशनात लावून धरली होती. भूमिपुत्रांच्या बाजूनेच सरकार निर्णय घेणार यासाठी आमदार सरनाईक यांचे प्रयत्न सुरु होते. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा- भाईंदर कला महोत्सवाला आले असता त्यांच्या समोरही आमदार सरनाईक यांनी कारशेडचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी भाषणात मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जाहीरपणे दिले होते. भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येणारी मेट्रो आता उत्तन पर्यंत जाईल. या परिसरातील ग्रामस्थांना मेट्रोचा फायदा होईल, शिवाय पर्यटनही वाढेल. मेट्रो पुढे नेण्यासाठी व उत्तन येथे कारशेड करण्यासाठी सरकारवर अतिरिक्त ४ ते ५ हजार कोटींचा खर्च होणार आहे. उत्तन येथे महसूल खात्याच्या शासकीय जमिनीवर डोंगर तोडून मेट्रो कारशेड बनवले जाणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळून मेट्रो पुढे उत्तनपर्यंत जाणार आहे. त्यामुळे तेथे जाणारा मुख्य रस्ता हा अधिक रुंद करावा लागणार आहे. या मार्गाने मेट्रो जाणार असल्याने १८ मीटर ऐवजी रस्ता ३० मीटर रुंद होईल , असे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. कारशेड पुढे उत्तनपर्यंत याच रस्त्यावरून न्यायचे असल्याने हा मुख्य रस्ता ३० मीटरचा केल्याशिवाय पर्याय नाही , असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. भाईंदरजवळील मोरवा गावातील नियोजित मेट्रो विकास आराखड्यात कारशेडचे आरक्षण ठेवण्याविरोधात स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून १ हजार ७१ लेखी हरकती कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केल्या गेल्या होत्या. तसेच मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे मोरवा , राईमुर्धे व मुर्धे गावातील ४२८ हून अधिक बांधकामे , शेत जमिनी व स्थानिकांची घरे बाधित होणार असल्याने ग्रामस्थांकडून मेट्रो कारशेड शासकीय जमिनीत उभारण्याची मागणी होत होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -