भाईंदर : मीरारोड नया नगर पोलीस ठाणे हद्दीत ३ जानेवारी शुक्रवारी रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आरोपीने गोळी झाडल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. त्यानंतर सदरील घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेची पाच पथके आणि प्रत्येकी पोलीस ठाणे यांची पथके तैनात करण्यात आली होती. त्यात गुन्हे शाखा -१ यांच्याकडून दोन आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी फरार आहे. बंदुकीने गोळीबार करुन खून करणाऱ्या दोन आरोपीतांस २४ तासांच्या आत अटक करण्यात काशीमिरा गुन्हे शाखा कक्ष – १ यांना यश आले आहे. मीरारोड पूर्वेच्या शांती शॉपींग सेंटरमधील ए-विंगच्या जिन्या जवळील एका बंद दुकानाच्या समोर असलेल्या सिमेंटच्या ओट्यावर प्रत्यक्ष साक्षीदार ऊमर रमजान सोलंकी आणि यातील मयत इसम शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु हे गप्पा मारत बसले होते. यावेळी सोनूच्या डाव्या बाजुला डोक्यात पीस्टलने फायर करून त्यास जीवानिशी ठार मारण्यात आले होते.त्यानंतर आरोपी मीरारोड पूर्व, रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म नं.४ चे दिशेने पळून गेला होता.
या घटनेबाबत इसा इब्राहीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून नयानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा व हत्यार कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष- १ काशिमीरा करित असताना अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले होते. सदर गुन्हयांतील मिळालेल्या फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करुन व मिळालेल्या माहितीवरुन सदर गुन्हयांतील आरोपी सैफअली मन्सुरअली खान (वय-२२ वर्षे), याला ४ जानेवारी रोजी नालासोपारा येथून ताब्यात घेण्यात आले होते. नमूद आरोपीने सांगितल्याप्रमाणे पंचनाम्यात गुन्हा करण्यासाठी वापरलेली गावठी बनावटीची एक पिस्तुल, मॅगेझीन आणि ६ बुलेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील दुसरा आरोपी मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम (वय ३४ वर्षे) याला ४ जानेवारी रोजीच बदलापूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. सदर आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. तर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, राजु तांबे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, सचिन सावंत, समिर यादव, सुधीर खोत, विकास राजपुत पोलीस शिपाई सनी सुर्यवंशी, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे किरण असवले तसेच गुन्हे शाखा कक्ष-२ वसईचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते व सायबर गुन्हे शाखा यांनी केली.
७ पथके केली होती स्थापन
मीरा रोड येथे शुक्रवारी झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी नया नगर पोलिसांनी ७ पथके स्थापन केली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांनी दिली होती.
Edited By Roshan Chinchwalkar