घरपालघरपालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या सदनिका

पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या सदनिका

Subscribe

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते वितरण

पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १० मधील सदनिकांचे वाटप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या ए ३ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रवीण आव्हाड, जागृती मेहेर, रुक्मिणी राठोड, अदिती सरनोबत, फिरोझ तडवी यांना सदनिकेचे प्रथम सूचना पत्रही प्रदान करण्यात आले. कोकण मंडळातर्फे उर्वरित सदनिका लाभार्थीना लवकरच प्रथम सूचना पत्र पाठविली जाणार आहेत.        म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा ३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या ४ जानेवारी २०१९ रोजीच्या ठराव क्रमांक ६८०९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

१८६ सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरता मार्च २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली. त्यानुसार पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून १०९ अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली. या १०९ कर्मचाऱ्यांना इमारतीतील कितव्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वितरित करावयाची, याची निश्चिती आणि त्यांचे वितरण करण्यात आले. पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी प्राप्त झाल्यास उर्वरित ७७ सदनिकांचेही वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ ४३४.९७ ते ४५३.२७ चौरस फूट असून या सदनिकांची अंदाजित विक्री किंमत २७. ०० लाख रुपये आहे. या योजनेतील टप्पा ३ मधील इमारतींना वसई विरार शहर महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -