चहासाठी प्रहारच्या जिल्हाध्यक्षाचा महासभेत धुमाकूळ; पोलिसांकडून अटक

महासभा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत पाणी आणि चहा न दिल्याने संतापलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने थेट सभागृहात घुसून डायसवर चढून धुमाकूळ घातला.

महासभा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत पाणी आणि चहा न दिल्याने संतापलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने थेट सभागृहात घुसून डायसवर चढून धुमाकूळ घातला. तसेच महापौरांशी उद्धट वर्तन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हाणामारीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या जिल्हाध्यक्षाला काशीमीरा पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. मिरा भाईंदर महापालिकेची सोमवारी महासभा चालू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले प्रहार संघटनेचे मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी दुपारी सभागृहात घुसून थेट डायसवर जाऊन महापौर व आयुक्तांशी हुज्जत घालती. प्रेक्षक गॅलरीत पाणी, चहा मिळत नसल्याची तक्रार करत त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी पाचारण केल्यानंतर निकम यांना ताब्यात घेतले. निकम एका हाणामारीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याने ही माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना अटक केली.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.  जोपर्यंत त्या इसमावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मी महासभेच्या सभागृहात पाय ठेवणार नाही. महाराष्ट्र सुरक्षा बलांच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होऊन निलंबन होत नाही, तोपर्यंत महासभेत जाणार नाही. हा फक्त महासभेचा अपमान नसून संपूर्ण मीरा भाईंदर शहराला काळीमा फासणारी घटना आहे.
– ज्योत्स्ना हसनाळे, महापौर
महापालिकेच्या सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये देऊन सुरक्षरक्षक नेमले जातात. महासभा सुरु असताना सभागृहात जाण्यास मनाई असते. असे असताना निकम सुरक्षा कवच भेदून थेट डायसपर्यंत पोहोचल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डायसवर धुमाकूळ घालून महापौरांशीच वाद घालत असलेल्या निकम यांना सुरक्षारक्षक अडवू शकले नाहीत. अखेर नगरसेवक शिपायांच्या मदतीने महापौरांच्या मदतीसाठी धावून गेले. आयुक्तांना यापूर्वीही सुरक्षा व्यवस्थेची खबरदारी घ्यावी, असे सांगितले असतानाही खबरदारी घेतली नाही. प्रशासन महापौरांची सुरक्षितता घेऊ शकत नाहीत. सुरक्षा व्यवस्थेवर करोडो रुपये खर्च करत असताना सुरक्षा व्यवस्थेवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. महापौरच सुरक्षित नाहीत, ही गंभीर बाब आहे. सुरक्षा व्यवस्था काय कामाची, असा संताप महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी यावेळी व्यक्त केला. निकम यांना उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, महापालिका सभागृहात विना परवानगी प्रवेश करणे, याबाबतचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
आरोपी हा काशीमिरा येथील एका मारामारीच्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. त्याची माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी जाऊन आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
– संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशीमिरा पोलीस ठाणे
सकाळी अकरा वाजल्यापासून प्रेक्षक गॅलरीत बसलेलो असून आपल्याला साधा चहा, पाणीदेखील दिले नाही. शिपायांना पाणी मागितले असता, त्यांनी दुर्लक्ष केले. याचा जाब विचारण्यासाठी मी महापौरांचा विरोध करण्यास आलो असल्याचे निकम यांनी सांगितले.