विरार : नालासोपारा विधानसभेचे निर्वाचित आमदार राजन नाईक यांनी नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच वसई शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पालिकेच्या रुग्णालयांना सरप्राईज भेट देत रुग्णालयाची पाहणी केली. तसेच तेथील रुग्णालयात आवश्यक लागणार्या बाबी संदर्भात वैद्यकीय अधिकारी यांच्याजवळ चर्चा केली. वसई- विरार शहर पालिकेचे सामान्य रुग्णालय सुरु झाल्यापासून ज्या सुविधा नागरिकांना मिळायला हव्या होत्या त्या काही प्रमाणावर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. याच अनुषंगाने आमदार राजन नाईक यांनी पाहणी करण्यासाठी नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णालयांना अचानक भेट दिली. तसेच उपचार सुरू असलेल्या रूग्णांजवळ मिळणार्या सुविधांबाबत चर्चा केली.
रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर वाघ यांच्याकडे सुविधा संदर्भात आमदारांनी विचारणा केली असता त्यांनी या ठिकाणी डॉक्टरांचा अभाव आहे, एक्स रे मशीन नाही, भूल तज्ञ् अधिकारी नाही, स्वच्छता दूत नाही, कामगारांसाठी जेवण्यासाठी कँटीन नाही, गायनलॉजिस्ट तज्ञ नाही अशा अनेक समस्या असून त्या वर लवकरात लवकरच तोडगा काढणे आवश्यक आहे, असे आमदार राजन नाईक यांना सांगितले. आमदारांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांना दूरध्वनी करून थेट असलेल्या समस्यांविषयी विचारणा करत अनेक सूचना केल्या आहेत. यापुढे येणार्या प्रत्येक रुग्णाला कोणताही त्रास होता कामा नये. तसेच कोणत्याही प्रकारची हलगर्जी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही, असे आमदारांनी यावेळी सांगितले आहे. वसई -विरारमधील जनतेला एक उच्च प्रतीचे उपचार याच ठिकाणी मिळतील. नागरिकांना मुंबईसारख्या ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही, असे मत आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केले आहे.