वसईः लोकसंख्येनुसार वसई -विरार महापालिकेला जादा पाणी देणे गरजेचे असताना एमएमआरडीएने मीरा भाईंदर महापालिकेच्या वाट्याला अधिकचे पाणी देऊन वसईवर दुजाभाव दाखवत अन्याय केल्याची तक्रार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केली आहे. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करत असताना २०११ च्या जनगणने नुसार वसई -विरार महापालिकेची लोकसंख्या १२.२१ लाख ग्राह्य धरून १४२ दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तूट होती. त्या अनुषंगाने १८५ दशलक्ष लिटर पाणी वसई -विरार शहर महापालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आले. तर दुसर्या बाजूला मीरा- भाईंदर महापालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८.१५ लाख ग्राह्य धरून १०० दशलक्ष लिटर पाण्याची तूट असताना सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून २१८ दशलक्ष लिटर पाणी देण्याचे ठरले असून यातून एमएमआरडीएचा दुजाभाव दिसून येत असल्याची चव्हाण यांची तक्रार आहे.
मीरा -भाईंदर महापालिकेची तूट १०० दशलक्ष असताना त्यांना त्याच्या दुप्पट म्हणजे २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. तर वसई -विरार शहर महापालिकेला १४२ दशलक्ष लिटरची मागणी असताना फक्त १८५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाणार आहे. हा वसई विरारकरांवर अन्याय नाही का ?. आज वसई विरार शहर महापालिकेची लोकसंख्या २१ लाखांच्या पुढे गेली आहे. सदर योजनेतून मिळणारे पाणी पुरेसे आहे का ?. या योजनेतून कमी मिळणार्या पाण्याचे अपयश घेण्यासाठी कोण पुढे येणार ?, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.