वसईः वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने पत्रव्यवहार करूनही वाढीव ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी देण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वेळकाढू धोरण अवलंबत आहे. हे पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी पालघर जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजता एमएमआरडीएच्या मुंबई-वांद्रे येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवेसेना नेते आदित्य ठाकरे आणि पालघऱ जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे सहभागी होणार आहेत.वसई-विरार महापालिकेची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख इतकी आहे. या लोकसंख्येची पाण्याची मागणी ३७२ दशलक्ष लिटर इतकी आहे. महापालिकेला सर्व स्रोतांतून मिळून २३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असून, १४२ दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तूट भासत आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी एमएमआरडीए सूर्या (४०३ दशलक्ष लिटर) पाणीपुरवठा योजनेतून महापालिका क्षेत्रात १६५ दशलक्ष लिटर पाणी आणण्याकरता जलवाहिनी अंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तूर्त ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी काशिद-कोपर येथून उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण झालेली आहे. सदरचे वाढीव पाणी जुलैअखेर वसई-विरार महापालिकेस उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु, एमएमआरडीएच्या माध्यमातून वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केला आहे. शहराची पाण्याची वाढती मागणी व त्यामुळे उद्भवणार्या समस्यांमुळे महापालिकेस नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेने सातत्याने एमएमआरडीएसोबत पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रव्यवहाराला आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. परिणामी वसई-विरारकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरवासीयांची गरज लक्षात घेता; काशिद-कोपर येथून देण्यात येणारे ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. या मागणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून याआधी दोनवेळा महापालिका मुख्यालयासमोर आंदोलनेही करण्यात आलेली होती. त्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. त्यात आता काशिद-कोपर येथून उपलब्ध होऊ शकणारे ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणीदेखील वसई-विरारकरांना देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या पाण्यात महापालिकेऐवजी एमएमआडीएच खोडा घालत आहे. त्यामुळेच एमएमआरडीएविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.