मोखाडा : मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ,आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा झाला असल्याचे भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.एका गरोदर मातेला प्रसूतीनंतर अती रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याची मनाला हलवून टाकणारी घटना मोखाड्यात घडली आहे. परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबीयाने केला आहे.
मोखाडा तालुक्यापासून 15किमी अंतरावर असलेल्या मोर्हांडा ग्रामपंचायतीमधील कोलद्याचा पाडा येथील गरोदरमाता आशा नंदकुमार भुसारे, वय (22वर्ष ) हिला प्रसूतीसाठी 25तारखेला पहाटे 3:00 वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ,परंतु यावेळी दिवसभर कोणताही उपचार न करता डिलिव्हरी पेशंटला इथून तिथून येजा करण्यास सांगितले. यानंतर प्रसूती होईल या आशेने यामध्ये दुसरा दिवस उलटला असल्याचे कुटूंबियांनी सांगितले.
यानंतर 26तारखेला सकाळी 9:00वाजेच्या दरम्यान प्रसूती होऊन या मातेने नवजात बालकाला जन्म दिला.परंतु यानंतर तिला प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. अक्षरश एक तास रक्तस्राव सुरु असल्याचे कुटूंबियांनी सांगितले .यानंतर तिला पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले.तिथे चार बॉटल रक्त तिला देण्यात आले,तरी देखील रक्तस्राव सुरूच होता. रक्तस्राव थांबवण्यासाठी उपचार करूनही थांबत नसल्याने पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल येथे पाठवण्यात आले.यावेळी अर्ध्यारस्त्यातच तिचा मृत्यू झाला .या घटनेने पंचक्रोशीत प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असून किती दिवस आदिवासींना किड्यामुंग्या प्रमाणे तडफडवून मरून देणार आहात ?असा संतप्त प्रश्न या निमित्ताने विचारला जात असून दोषींवर कडक कारवाईची मागणीने जोर धरला आहे.
माझ्या पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल झाली. परंतु या नंतर डॉक्टर ,नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच रक्तस्राव झाला आहे. रक्तस्राव झाल्यानंतरही खूप विलंब लावला. वेळीच आमचे पेशंट सिव्हिल रुग्णालयात पोहचले असते, तर वाचले असते. याची योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी
– नंदकुमार भुसारे,
मृत मातेचे पती
प्रसूती झाल्यानंतर काही वेळाने गर्भपिशवी कडक होणे गरजेचे असते. अन्यथा रक्तस्राव सुरु होतो. या मातेची गर्भ पिशवी कडक न झाल्याने तिला रक्तस्राव सुरु झाला. यावेळी रक्तस्राव थांबवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. तिला तात्काळ रक्ताच्या बॉटलही देण्यात आल्या. परंतु तिचा रक्तस्राव थांबत नव्हता. यावेळी गर्भपिशवीचे ऑपरेशन करणे गर्भपिशवी काढून टाकणे ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. परंतु आपल्याकडे अद्यावत सुविधा नसल्याने नाशिक सिव्हिलला पाठवण्यात आले. परंतु तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला
-डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक
मोखाडा ग्रामीण रुग्णलाय
अति रक्तस्त्राव झाल्याने आशा भुसारे यांना रक्त देणे आवश्यक होते. त्यामुळे तातडीने जव्हार येथील कुटीर रुग्णालयात पाठवून तिला रक्त दिले. परंतु रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला पुढे नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.परंतु अती रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
-डॉ. भाऊसाहेब चत्तर , तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा